रखडलेल्या आंबेडकर स्मारकाचे काम होणार पूर्ण
By admin | Published: December 21, 2015 01:21 AM2015-12-21T01:21:58+5:302015-12-21T01:21:58+5:30
कुळगाव-बदलापूर नगरपरिषद हद्दीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम निधीअभावी रखडले असून ते काम पूर्ण करण्यासाठी आता पालिकेने पुढाकार घेतला आहे
बदलापूर : कुळगाव-बदलापूर नगरपरिषद हद्दीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम निधीअभावी रखडले असून ते काम पूर्ण करण्यासाठी आता पालिकेने पुढाकार घेतला आहे. ५१ लाखांचा निधी नेऊन ते काम पूर्ण करण्यात येणार आहे.
बदलापूरच्या सोनिवली गावाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी राज्य शासनाने वैशिष्ट्यपूर्ण कामांतर्गत ५० लाखांचा निधी दिला होता. या निधीतून केवळ स्मारकाचे आरसीसी बांधकामच पूर्ण करता आले आहे. उर्वरित स्मारकाच्या कामासाठी ४ कोटी ९५ लाख रुपये शासनाच्या दलित वस्ती सुधारणा योजनेंतर्गत मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविला होता. मात्र, त्यावर अद्यापही निर्णय न झाल्याने हे स्मारकाचे काम रखडलेल्या अवस्थेत राहिले आहे.
या स्मारकाचे काम पूर्ण करण्यासाठी ३० आॅक्टोबर २०१५ रोजी सर्वसाधारण सभेत २५ लाखांची तरतूद केली. या अंतर्गत जागेचे सपाटीकरण, पादचारी मार्ग, परिसर सुशोभीकरण ही कामे करण्यात येणार आहे. या निधीतूनही हे काम अर्धवट राहणार असल्याने शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत आणखी २६ लाखांची तरतूद केली आहे. या निधीतून स्मारकाचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न पालिका करत आहे.