कोपरी रेल्वेपुलावर लोखंडी तुळई बसवण्याचे काम पूर्ण; प्रथमच १२०० टनांच्या क्रेनचा वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 12:08 AM2021-01-25T00:08:51+5:302021-01-25T00:09:07+5:30
मध्य रेल्वेच्या कोपरी पुलावर पहिल्या टप्प्यातील सात लोखंडी तुळई (गर्डर)पैकी चार रविवारी पहाटेपर्यंत बसवण्यात आल्या.
ठाणे : पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोपरी रेल्वे उड्डाणपुलाजवळील भुयारी मार्गावर लोखंडी तुळई बसवण्याचे काम रविवारी पहाटे काही प्रमाणात पूर्ण झाले. यावेळी देशात मध्य रेल्वेकडून प्रथमच १२०० टन वजन उचलणारी महाकाय क्रेन वापरण्यात आली. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार राजन विचारे हेही यावेळी उपस्थित होते. उर्वरित काम रविवारी रात्री ते सोमवारी सकाळी या वेळेत पूर्ण केले जाणार हाेते.
मध्य रेल्वेच्या कोपरी पुलावर पहिल्या टप्प्यातील सात लोखंडी तुळई (गर्डर)पैकी चार रविवारी पहाटेपर्यंत बसवण्यात आल्या. पालकमंत्री एकनाथ शिंदे हेही रविवारी पहाटे २.३० वाजेपर्यंत या कामाच्या निगराणीसाठी उपस्थित होते. ठाणे शहरातील वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील व मध्य रेल्वेचे मुख्य अभियंता एस. एस. चतुर्वेदी, उपअभियंता डी. डी. लोळगे, स्टेशन डेव्हलपमेंट मुख्य अभियंता आर. के. मिश्रा, उपअभियंता अखिलेश सक्सेना, मध्य रेल्वे वरिष्ठ अभियंता सुरेश पाखरे, एमएमआरडीएचे अधीक्षक अभियंता प्रकाश भामरे आणि कार्यकारी अभियंता विनय सुर्वे आदी अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली हे काम पार पडले. प्रत्येकी १०४ टन वजनाचे आणि ६५ मीटर लांबीचे चार गर्डर मुंबई ते ठाण्याच्या दिशेने बसविण्यात आले. हे गर्डर उचलण्यासाठी देशात प्रथमच मध्य रेल्वे प्रशासनाने १२०० टन वजन पेलणारी क्रेन कोपरी येथे पाचारण केली होती.