डीएफसी प्रकल्पासाठीची जमीन संपादन प्रक्रिया पूर्णत्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:47 AM2021-09-14T04:47:24+5:302021-09-14T04:47:24+5:30
कल्याण : जेएनपीटी ते दिल्ली हा मालवाहतुकीसाठीचा स्वतंत्र डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर या महत्त्वाकांशी प्रकल्पात कल्याण तालुक्यातील अनेक गावांची जमीन ...
कल्याण : जेएनपीटी ते दिल्ली हा मालवाहतुकीसाठीचा स्वतंत्र डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर या महत्त्वाकांशी प्रकल्पात कल्याण तालुक्यातील अनेक गावांची जमीन बाधित होत आहे. या गावातील जमिनी प्रकल्पासाठी संपादीत करण्याची प्रक्रिया पाच वर्षांपासून सुरू होती. तीन टप्प्यांत ही जमीन संपादनाची प्रक्रिया पूर्णत्वास आली असल्याची माहिती कल्याणचे उपविभागीय अधिकारी अभिजित भांडे पाटील यांनी दिली.
पहिल्या टप्प्यात काटई, भोपर, नांदिवली, उसरघर, निळजे, नवागाव, जुनी डोंबिवली, ठाकुर्ली, गावदेवी आणि आयरे या गावांचा समावेश होता. या दहा गावांतील जमीन संपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. जमीन संपादनाची एकूण रक्कम १३३ कोटी ९९ लाख रुपये संपादन संस्था व उपविभागीय अधिकाऱ्यांच्या संयुक्त खात्यात जमा केली आहे. त्यापैकी मोबदल्याची ९५ कोटी ७९ लाख रुपये ही रक्कम खातेदारांना वाटप करण्यात आली आहे. शिल्लक रक्कम दिवाणी न्यायालयात जमा करण्यासाठी अहवाल सादर केला आहे. सरकारी बाजू मांडण्यासाठी सरकारी वकील एस. आर. कुलकर्णी यांची नियुक्ती केली आहे. न्यायालयाकडून आदेश येताच ही रक्कम न्यायालयाकडे जमा केली जाईल.
दुसऱ्या टप्प्यात काटई, भोपर, निळजे, उसरघर, गावदेवी, नांदिवली या गावांतील जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. मोबदल्याची २२६ कोटी ८५ लाख रुपये संपादन संस्था आणि उपविभागीय कार्यालयाकडे जमा करण्यात आली आहे. काही भूधारकांना नोटिसा पाठविल्या आहेत. तर १९६ कोटी १६ लाख रुपयांची रक्कम खातेदारांना वाटप करण्यात आली आहे. उर्वरित रक्कम वाटपाची कार्यवाही सुरू आहे.
खातेदारांना दिले सव्वापाच कोटी
तिसऱ्या टप्प्यात काटई, भोपर, निळजे, उसरघर, गावदेवी, नांदिवली या गावांतील जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. २० कोटी ३३ लाख रुपये एवढी रक्कम संपादन संस्थेकडे जमा करण्यात आली आहे. त्यापैकी पाच कोटी २० लाख रुपये खातेदारांना वाटप करण्यात आली आहे. उर्वरित रकमेचे वाटप कार्यालयाकडून सुरू असल्याचे उपविभागीय अधिकारी भांडे पाटील यांनी सांगितले.
------------------------