आदिवासी तरुणीवर अवघड शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 11:49 PM2019-01-15T23:49:56+5:302019-01-15T23:50:26+5:30
जिल्हा रुग्णालयामुळे मिळाले जीवनदान : पोटातील आतडी छातीकडे सरकल्याने होत होता त्रास
- पंकज रोडेकर
ठाणे : लाखो रुपये खर्चून करावी लागणारी जोखमीची शस्त्रक्रिया अनेक अडथळ््यांना सामोरे जात, ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी यशस्वीरित्या करून एका १७ वर्षीय आदिवासी मुलीला जीवनदान दिले. ‘कजनायटल डायफ्रेगमेटीक हर्णिया’ ही अवघड शस्त्रक्रिया पहिल्यांदा यशस्वीपणे करून जिल्हा रुग्णालयाने इतिहासात नोंद केली आहे. सध्या ती रुग्ण मुलगी अतिदक्षता कक्षात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे. दोन-तीन दिवसात तिला घरी सोडण्यात येईल, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
कसारा, येथील डिंगाळमाळ या आदिवासी भागातील मनिषा मंगा केवरे (१७) असे त्या रुग्ण मुलीचे नाव आहे. तिला श्वसनाचा त्रास होत असल्याने शासकीय रुग्णालयात २२ डिसेंबर रोजी दाखल केले. यावेळी तिच्या पोटातील अवयव हे छातीच्या डाव्या बाजूला असल्याचे समोर आले. या शस्त्रक्रियेसाठीची उपकरणे नसल्याने डॉक्टरांनी तिला जे.जे. रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. मात्र कुटुंबीयांच्या भूमिकेमुळे शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. निशीकांत रोकडे यांनी शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेसाठी शल्यचिकित्सकांनी उपकरणे उपलब्ध करुन दिली.
अडीच तास चालली शस्त्रक्रिया
दहा हजारांमध्ये दोन जणांना हा आजार होतो. त्यानुसार, या आजारावर करण्यात येणारी शस्त्रक्रिया बहुदा सुपरस्पेशालिटी रुग्णालयात केली जाते. मात्र, ती खर्चिक समजली जाते. ती शस्त्रक्रिया तब्बल अडीच ते पावणे तीन तासात जिल्हा रुग्णालयात पार पडली आहे.
या टीमने केली शस्त्रक्रिया : डॉ. रेखा गझलरवार, निशीकांत रोकडे, पूजा मुलतानी, भूलतज्ज्ञ मनिष अरोरा, स्वाती काळे, परिचारिका विजया पिंगट आणि छाया पाटील यांचा शस्त्रक्रिया करणाऱ्या टीममध्ये समावेश होता.