सत्तेसाठी नाराजांना वाटा, भाजपाकडून मनधरणी : आयलानी, इदनानी, कलानींना संयुक्त जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 02:54 AM2017-10-14T02:54:45+5:302017-10-14T02:54:52+5:30
महापालिकेत सत्तेसाठी भाजपाने ओमी कलानी गटाला आपल्यास सामावून घेतले आणि निवडणुकीनंतर जीवन ईदनानी यांच्या साई पक्षाची मदत घेतली.
उल्हासनगर : महापालिकेत सत्तेसाठी भाजपाने ओमी कलानी गटाला आपल्यास सामावून घेतले आणि निवडणुकीनंतर जीवन ईदनानी यांच्या साई पक्षाची मदत घेतली. पण कलानी आणि ईदनानी यांना सांभाळून घेण्यात पक्षाचे नेते अुयशी ठरल्याने, त्यातून नाराजी वाढल्याने आणि कलानी गट बहिष्काराच्या पवित्र्यात गेल्याने अखेर भाजपा, कलानी गट आणि साई पक्षाची समन्वय समिती स्थापन करून सत्ता टिकवण्याची धडपड भाजपाने केली आहे.
राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी तिन्ही गटांत मध्यस्थी घडवून आणली. उल्हासनगर पालिकेवर एकहाती सत्तेसाठी भाजपने शिवसेनेला डावलून ओमी कलानी टीमशी संधान बांधले. त्यांच्यासोबत महाआघाडी केल्याचे दाखवत अप्रत्यक्षपणे त्यांना पक्षात घेतले. ओमी टीमचे बहुतांश उमेदवार भाजपाच्या चिन्हावर निवडून आले. पण त्यानंतरही एकहाती सत्तेसाठी स्थानिक साई पक्षाच्या मदतीचा हात भाजपला घ्यावा लागला. त्याबद्दल्यात उपमहापौर, स्थायी समिती सभापती पदासह प्रभाग व विशेष समितीचे सभापती आदी पदे द्यावी लागली. पण उरलेली पदे भाजपाला देताना ओमी टीमला पुढील वर्षी पदे देण्याचे आमिष दाखवून त्यांच्या तोंडाला पाने पुसली. महत्वाची पदे न मिळाल्याने त्या टीममध्ये नाराजी पसरली आणि त्यातून भाजपात राहूनही ओमी यांचा गट स्वतंत्रपणे काम करत राहिला. त्या गटाचे स्वतंत्र अस्तित्त्व निर्माण झाले. वाढत गेले.
महापालिका प्रभाग समिती व विशेष समिती सभापती निवडणुकीत ओमी कलानी टीमने भाजपाविरोधात उठाव करत शिवसेनेसोबत जवळीक साधली. त्यामुळे त्यांना बहुतांश प्रभाग समिती सभापती व विशेष समिती सभापती पदे पदरात पाडली असून शिवसेनेलाही एका समितीचा लाभ झाला. तसेच भाजपा शहरजिल्हाध्यक्ष कुमार आलयानी यांनी बोलावलेल्या नगरसेवक व पदाधिकाºयांच्या बैठकीला कलानी टीमचे मात्र भाजपाच्या तिकीटावर निवडून आलेले नगरसेवक दांडया मारत आहेत.
गेल्या महिन्यात २० कोटीच्या निधीतील रस्ता भूमिपूजनावरून शिवसेना व भाजपा आमने-सामने आली. भविष्यातील धोका ओळखून भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी बचावाचा पवित्रा घेतला. टाऊन हॉलमध्ये भाजपा, ओमी कलानी टीम, साई पक्षाचे नगरसेवक व पदाधिकाºयांची बैठक राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी घेतली. बैठकीत चव्हाण यांनी पालिका व शहर विकासाची जबाबदारी आयलानी, ओमी कलानी व उपमहापौर जीवन इदनानी यांच्यावर सोपवली. शहर विकासाच्यादृष्टीने निर्णय घेण्याचे अधिकार या तिघांना देण्यात आले.