खाजगी इंग्रजी शाळांकडून सक्तीने फीवसुली, पालकांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 01:36 AM2020-08-31T01:36:00+5:302020-08-31T01:36:43+5:30

प्रवेश रद्द केल्यास शाळांवर छडी उगारण्याचा मनसेचा इशारा

Compulsory fee collection from private English schools, parents allege | खाजगी इंग्रजी शाळांकडून सक्तीने फीवसुली, पालकांचा आरोप

खाजगी इंग्रजी शाळांकडून सक्तीने फीवसुली, पालकांचा आरोप

Next

ठाणे : लॉकडाऊनच्या काळातही काही खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडून सक्तीने फीवसुली केली जात असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. विद्यार्थी घरातूनच आॅनलाइन शिक्षण घेत असताना प्रवेश फीबरोबर इतर सुविधांची फी भरण्याचा तगादा या शाळांनी लावला आहे. तसेच फी न भरल्यास विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द केला जाईल, असेही शाळांनी सांगितल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. याबाबत, मनसेकडे पालकांच्या तक्रारी आल्या आहेत. फी न भरलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द केल्यास शाळांवर मनसे स्टाइलने छडी उगारणार असल्याचा इशारा मनसेने दिला आहे.
काही इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळांनी पालकांना ३१ आॅगस्टपर्यंत चालू शैक्षणिक वर्षाची फी भरण्यास सांगितले आहे. परंतु, लॉकडाऊनमध्ये अनेक पालकांच्या नोकऱ्या गेल्याने त्यांना फी भरणे शक्य नाही. त्यामुळे या फीमध्ये सवलत द्यावी आणि प्रवेश फीव्यतिरिक्त इतर फी वसूल करू नये, अशी मागणी पालक प्रतिनिधींनी शाळा व्यवस्थापनाकडे केली. परंतु, त्यांच्याकडे विनंती करूनही शाळा व्यवस्थापन दुर्लक्ष करीत असल्याच्या तक्रारी मनसेकडे आल्या आहेत.
याबाबत राबोडी येथील सरस्वती विद्यालय शाळेतील पाचवी इयत्तेच्या पालक प्रतिनिधींनी सांगितले की, प्रवेश फीसह प्रयोगशाळा, क्रीडा, मासिक फी, टर्म फी, वाचनालय, संगणक या इतर फीदेखील भरण्याची सक्ती शाळा व्यवस्थापनाने केली आहे. सध्या विद्यार्थी आॅनलाइन शिक्षण घेत आहेत. त्यामुळे इतर सुविधांची फी घेण्याचा प्रश्नच येत नाही. आॅनलाइन शिक्षणासाठी पालकांनी लॅपटॉप, टॅब खरेदी केले, हा भुर्दंड त्यांना बसला नाही का, असा सवालही त्यांनी केला आहे. आता प्रवेश अर्ज भरून घ्या आणि नंतर फी घ्या किंवा प्रवेश अर्ज आणि प्रवेश फीच घ्या. पण, शाळा व्यवस्थापन काहीच ऐकायला तयार नाही.

सरकारच्या ३० मार्च २०२० रोजीच्या परिपत्रकात लॉकडाऊन काळात फी भरण्याची सक्ती करू नये, असे म्हटले आहे. हे आम्ही सर्व शाळांना कळविले आहे. पालक त्यांच्या इच्छेनुसार दरमहा, तीन महिन्यांची किंवा वर्षभराची फी भरू शकतात, अशी कायद्यात तरतूददेखील आहे. इतर फी न भरण्याच्या संदर्भात पालक आणि शाळा व्यवस्थापनाने बैठक घ्यावी. त्यात पालकांना त्यांचे म्हणणे मांडता येईल. तसेच, ते फीसंदर्भात असलेल्या समितीकडे जाऊ शकतात.
- शेषराव बडे, शिक्षणाधिकारी,
जिल्हा परिषद

कोरोनाकाळात आॅनलाइन शैक्षणिक साहित्य उदा. लॅपटॉप, वायफाय इत्यादींचा जादा खर्च पालकांना करावा लागत आहे. शाळा प्रशासनाने फी कमी केलीच पाहिजे. शाळा व्यवस्थापनाने पालकांच्या आर्थिक परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा. कोणत्याही विद्यार्थ्याला फी नाही भरली म्हणून शाळेतून काढले, तर मनसे छडी उगारल्याशिवाय राहणार नाही.
- संदीप पाचंगे,
जिल्हाध्यक्ष, मनविसे

कोविड कधी संपणार, हे माहीत नाही. मग प्रयोगशाळा, वाचनालय, संगणक हे नष्टच करून टाकावे का? इलेक्ट्रॉनिक वस्तू, मैदान यांची देखभाल शाळेला करावी लागते. शिक्षक हे माणसे नाहीत का? पालकांनी शिक्षकांना समजून घेण्याची गरज आहे. पालकांना जूनची फी भरायला सांगितली आहे. ३१ आॅगस्ट अंतिम तारीख ही सरकारने दिली आहे. त्यामुळे आम्ही पालकांना या तारखेपर्यंत फी भरण्याचे सांगितले आहे. - मीरा कोर्डे, सरस्वती विद्यालय, राबोडी
 

Web Title: Compulsory fee collection from private English schools, parents allege

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.