येत्या शैक्षणिक वर्षापासून संगणकाचे प्रशिक्षण सुरु झालेच पाहिजे; आयुक्तांची शिक्षण विभागाला सक्त ताकीद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2018 06:47 PM2018-03-15T18:47:43+5:302018-03-15T18:47:43+5:30
शिक्षण विभागासह संगणक विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती. त्यात आयुक्तांनी येत्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे संगणक प्रशिक्षण सुरु झालेच पाहिजे. त्यासाठी लवकरात लवकर योग्य कार्यवाही सुरु करण्याची सक्त ताकीद त्या-त्या विभागातील अधिकाऱ्यांना दिली.
- राजू काळे
भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिका शाळांत गेल्या वर्षभरापासून विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण मिळत नसल्याचे वृत्त लोकमतने हॅलो ठाणे पुरवणीत १४ मार्चला प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत आयुक्त बळीराम पवार यांनी आपल्या दालनात गुरुवारी शिक्षण विभागासह संगणक विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती. त्यात आयुक्तांनी येत्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे संगणक प्रशिक्षण सुरु झालेच पाहिजे. त्यासाठी लवकरात लवकर योग्य कार्यवाही सुरु करण्याची सक्त ताकीद त्या-त्या विभागातील अधिकाऱ्यांना दिली.
यामुळे विद्यार्थ्यांच्या संगणक प्रशिक्षण सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिक्षण विभागाने २००६ मध्ये ३५ पालिका शाळांती विद्यार्थ्यांना कंत्राटी पद्धतीवर संगणकाचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली होती. यामागे खाजगी शाळांच्या तुलनेत पालिका शाळांतील शैक्षणिक दर्जा सुधारण्याचा उद्देश ठेवण्यात आला होता. यामुळे सामान्य तसेच गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना संगणकाचे दर्जेदार शिक्षण मिळण्यास सुरुवात झाली. या प्रशिक्षणासाठी स्वतंत्र खोलीची व्यवस्था देखील करण्यात आली. विद्यार्थ्यांचे संगणक प्रशिक्षण सुरु असतानाच त्याचे कंत्राट २०१६ मध्ये संपुष्टात आले. कंत्राटाची मुदत वाढवून देण्याची कार्यवाही शिक्षण विभागाने सुरु केली. ती पुर्ण करण्यात आल्यानंतरही कंत्राटदाराला कार्यादेश न दिल्याने अखेर कंत्राटदार मेसर्स पॅम्से टेक्नोलॉजी या कंपनीने प्रशिक्षणाचा गाशा गुंडाळला. यात विद्यार्थ्यांचे संगणक प्रशिक्षण बंद पडले. तर स्वतंत्र प्रशिक्षणाची खोली कुलूपबंद झाली. तरीदेखील प्रशासन ढिम्म बसल्याने चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थी संगणक प्रशिक्षणापासून वंचित राहिले. त्याचे वृत्त लोकमतने १४ मार्चला प्रसिद्ध करताच आयुक्तांनी त्याची दखल घेत शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी भास्कर बाबर, सह शिक्षणाधिकारी सुरेश देशमुख व संगणक विभागाचे अधिकारी राजकुमार घरत यांची गुरुवारी बैठक बोलवली. त्यात आयुक्तांनी संगणक प्रशिक्षणापासून विद्यार्थ्यांना वंचित ठेवल्याबाबत अधिकाऱ्यांची कानफउघाडणी करुन संगणक विभागाच्या नियंत्रणात प्रशिक्षणाची प्रक्रीया सुरु करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. त्याची कार्यवाही लवकरात लवकर सुरु करुन येत्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना संगणकाचे प्रशिक्षण मिळण्यास सुरुवात झालीच पाहिजे, असा दम भरला. लोकमतच्या वृत्तामुळे बंद झालेले संगणक प्रशिक्षण पुन्हा सुरु होणार असल्याने शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी लोकमतचे आभार मानले.
पालिका शाळांतील संगणक प्रशिक्षण विनाखंड नियमित सुरु रहावे, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सोईस्कर व किफायतशीर प्रक्रीया सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रसंगी पालिकेच्या संगणक विभागाकडूनच प्रशिक्षण सुरु करुन संगणक बसविण्यासाठी भाडेतत्वावरील पर्याय तपासण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
- बळीराम पवार, आयुक्त