संगणक दोन महिन्यांपासून धूळखात
By admin | Published: February 17, 2017 02:01 AM2017-02-17T02:01:34+5:302017-02-17T02:01:34+5:30
महाराष्ट्र शासनाची २०११-१२ मध्ये सुरू केलेली आयसीटी योजना बंद झाल्याने शाळांतील लाखो रुपयांची संगणक यंत्रणा
भातसानगर : महाराष्ट्र शासनाची २०११-१२ मध्ये सुरू केलेली आयसीटी योजना बंद झाल्याने शाळांतील लाखो रुपयांची संगणक यंत्रणा आज अक्षरश: धूळखात पडून आहे. दुसरीकडे शालेय अभ्यासक्रमात मात्र संगणक विषयाचा समावेश आहे. त्यामुळे संगणक असूनही नियोजनाअभावी विद्यार्थी प्रत्यक्ष संगणकहाताळणीपासून वंचित राहणार आहेत.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक हाताळता यावा, त्याची माहिती व्हावी, यासाठी २०११-१२ पासून शिक्षण संचालनालय (माध्यमिक आणि उच्च माध्यमिक) यांच्या माध्यमातून संगणक प्रयोगशाळेचा (आयसीटी) प्रयोग सुरू करण्यात आला. शहापूर तालुक्यातील १३ शाळांमध्ये ही योजना सुरू झाली. त्यासाठी एक प्रशिक्षित शिक्षकही देण्यात आल्याने हजारो विद्यार्थी या संगणकहाताळणीत यशस्वी झाले.
त्यानंतर, अभ्यासक्रमात संगणक विषयाचा समावेश झाल्याने शासनाचा हा उपक्रम विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरत होता. मात्र, डिसेंबरमध्ये अचानक हा उपक्रमच बंद झाल्याने लाखो रुपयांची ही सामग्री आजही तालुक्यातील शाळांमध्ये धूळखात पडून आहे.
या उपक्रमासाठी शाळेत एक वेगळी संगणक रूमही तयार करण्यात आली होती. स्वतंत्र खोली असल्याने आठवड्यातील संगणकाच्या दोन तासांसाठी विद्यार्थी प्रत्यक्ष संगणक हाताळत होते. वाचन, लेखन यापेक्षा कृतीतून मिळणारे शिक्षण त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. मात्र, आता हा उपक्रम बंद झाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे ही योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी आता पालकांमधून जोर धरत आहे. (वार्ताहर)