‘क्रिप्टो’च्या नावाखाली गंडवले; तरुणीची साडेतीन लाखांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 08:26 AM2022-12-27T08:26:48+5:302022-12-27T08:27:28+5:30

गुंतवणूक करताना दक्षता घेणे गरजेचे

conceived in the name of crypto fraud of three and a half lakhs of a young woman | ‘क्रिप्टो’च्या नावाखाली गंडवले; तरुणीची साडेतीन लाखांची फसवणूक

‘क्रिप्टो’च्या नावाखाली गंडवले; तरुणीची साडेतीन लाखांची फसवणूक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे: क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीचे प्रलाेभन दाखवून ठाण्यातील धनश्री देशमुख (२२) या तरुणीची तीन लाख ६२ हजार ५९९ रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी दोन अनोळखी आरोपींविरुद्ध फसवणुकीसह माहिती-तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्याची माहिती कोपरी पोलिसांनी सोमवारी दिली. 

 कोपरीतील आनंदनगर येथील रहिवासी धनश्री हिला अल्फिया रूम आणि स्टीव्ह चार्ली यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे संपर्क साधला होता. त्यांनी संगणक साधनसामग्रीचा वापर करून इन्स्टाग्रामवर अल्फिया या नावाने खाते बनविले. त्याद्वारे शेअर्स आणि क्रिप्टो करन्सीत गुंतवणुकीचे प्रलाेभन दाखवून मोठी रक्कम देण्याचे आश्वासन दिले. स्वत:च अल्फिया, कंपनीचा प्रतिनिधी असल्याची ओळख सांगून अल्फिया आणि स्टीव्ह अशी नावे सांगितली. त्यानंतर २ जुलै २०२२ ते ८ जुलै २०२२ या कालावधीत धनश्री हिला व्हाॅट्सॲपसह इन्स्टाग्राम आणि इतर माध्यमांद्वारे संपर्क करून त्यांच्या कंपनीत तीन लाख ६२ हजार ५९९ रुपये दोन वेगवेगळ्या यूपीआय आयडीवर गुंतवण्यास भाग पाडले. 

त्यानंतर तिला त्यांनी कोणताही जादा परतावा तसेच स्वीकारलेली रक्कमही परत न करता सर्व माध्यमांद्वारे ब्लॉक करून तिची फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर धनश्री हिने याप्रकरणी अखेर कोपरी पोलिस ठाण्यात २५ डिसेंबरला तक्रार दिल्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हे दोन्ही आरोपी पसार असून त्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे कोपरी पोलिसांनी सांगितले.

क्रिप्टो करन्सीमध्ये फसवणुकीचे आणखी प्रकार

- हाँकाँगमध्ये एका बँकेत क्रिप्टो ॲनालिस्ट असल्याचे सांगून क्रिप्टो ट्रेडिंगमधून मोठा परतावा करून देऊ शकते, अशी बतावणी करून एका अनोळखी महिलेने मीरारोडच्या बँक व्यवस्थापकालाच तब्बल ६२ लाख १९ हजार रुपयांचा ऑनलाइन गंडा घातल्याची घटना चार दिवसांपूर्वी उघडकीस आली. याप्रकरणी नवघर पोलिस ठाण्यात दि. २४ डिसेंबर रोजी  गुन्हा दाखल झाला. 

- मीरारोडच्या फ्रॅगरंस गार्डन सिटीत राहणारे गिरीशकुमार शुक्ल (४१) हे मुंबईच्या बीकेसी येथील एका खासगी बँकेत व्यवस्थापक आहेत. त्यांच्या व्हॉट्सॲपवर परदेशी क्रमांकावरून हा मेसेज आला. त्यानंतर  हाँगकाँगमध्ये जेपी मॉर्गन चेस बँकेत क्रिप्टो ॲनालिस्ट असल्याचे सांगून त्या महिलेने क्रिप्टो ट्रेडिंग करण्यासाठी २०० डॉलरची गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर तिने त्यांना ६२ लाखांचा गंडा घातला.

क्रिप्टोचे ॲप खरे आहे का?

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवताना जशी काळजी घेतली पाहिजे तशीच अशा प्रकारच्या गुंतवणुकीत घेणे गरजेचे आहे. कोपरीतील मुलीने एकदम अनोळखी व्यक्तीशी २१ व्यवहार केले. एकाच दिवसात तिने तीन लाख ६२ हजार रुपये गुंतविले. कोणीही जादा परतावा देणारी व्यक्ती किती अधिकृत आहे, क्रिप्टोचे ॲप खरे आहे का, अशा सर्व बाबींची पडताळणी करूनच ऑनलाइन व्यवहार केले पाहिजे. - अविनाश सोंडकर, पोलिस निरीक्षक, कोपरी, ठाणे

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: conceived in the name of crypto fraud of three and a half lakhs of a young woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.