कोविड लसींच्या ग्लोबल टेंडरची चिंता मिटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:43 AM2021-05-20T04:43:44+5:302021-05-20T04:43:44+5:30
ठाणे : आर्थिक परिस्थिती नसतानाही ठाणे महापालिकेने पाच लाख लसींसाठी ग्लोबल टेंडर काढण्याची तयारी केल्याने हा खर्च कसा ...
ठाणे : आर्थिक परिस्थिती नसतानाही ठाणे महापालिकेने पाच लाख लसींसाठी ग्लोबल टेंडर काढण्याची तयारी केल्याने हा खर्च कसा करणार, असा सवाल गेल्या काही दिवसांपासून केला जात होता. भाजपनेदेखील या मुद्द्यावरून प्रशासनास घेरले होते. परंतु, कोविडसाठी राखीव ठेवलेल्या २०० कोटींच्या निधीतून पाच लाख लसींसाठी ५० कोटींचा खर्च करून ग्लोबल टेंडर काढणार असल्याची माहिती महापौर नरेश म्हस्के यांनी बुधवारी झालेल्या महासभेत दिली.
मुंबई महापालिकेच्या धर्तीवर ठाणे महापालिकेला ग्लोबल टेंडर काढता येणे शक्य नसल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिली होती. कर्मचाऱ्यांच्या पगारासाठीच शासनाकडून येणाऱ्या अनुदानावर अवलंबून राहावे लागत असल्याने टेंडर काढणे शक्य नसल्याचेही त्यांनी सांगितले होते. परंतु, लसींचा तुटवडा लक्षात घेऊन ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी लसींसाठी ग्लोबल टेंडर काढले जावे, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर प्रशासनाने तत्काळ पाच लाख लसींसाठी ग्लोबल टेंडर काढणार असल्याचे स्पष्ट केले. परंतु, यासाठी निधी कसा उभारणार, असा सवाल करण्यात आला होता. यावरून भाजपनेदेखील शंका उपस्थित केली होती.
परंतु, या सर्वांची उत्तरे बुधवारी झालेल्या महासभेत मिळाली आहेत. तसेच भाजपने उपस्थित केलेल्या शंकेची हवादेखील या वेळी महापौर नरेश म्हस्के यांनी काढली. महापालिका पाच लाख लसींसाठी टेंडर काढणार असून एका लसीसाठी एक हजाराचा खर्च अपेक्षित धरला तर साधारणपणे ५० कोटींचा खर्च केला जाणार आहे. हा खर्च करण्याचीदेखील महापालिकेची तयारी असून, त्यानुसार महासभेत या संदर्भातील आयत्या वेळेचा प्रस्ताव आणून तो मंजूर करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
* रशियाच्या स्पुतनिकला विचारणा करणार
यानुसार मुंबईला ज्या पद्धतीने रशियाने स्पुतनिक लस पुरविण्याचे सूतोवाच केले आहे, त्यानुसार ठाण्यासाठीदेखील त्यांना पाचारण करणार असल्याचे म्हस्के यांनी सांगितले. तर हा खर्च कसा केला जाणार, याचे उत्तरही त्यांनी दिले. ग्लोबल टेंडरसाठी येणारा खर्च हा कोविडसाठी राखून ठेवण्यात आलेल्या २०० कोटींतून केला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.