चिकूबागांवर बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 12:09 AM2020-09-25T00:09:15+5:302020-09-25T00:09:26+5:30
कृषी शास्त्रज्ञांची भेट : सुचवल्या उपाययोजना; फळगळतीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
बोर्डी : डहाणू तालुक्यात चिकू झाडावर बुरशीजन्य रोगामुळे फळांची गळ होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. यामुळे कृषी विज्ञान केंद्र, दापोली कृषी विद्यापीठ व महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या प्रतिनिधींनी विविध भागातील चिकूबागांना भेट दिली. या वेळी रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तज्ज्ञांनी उपाययोजना सुचवून मार्गदर्शन केले.
कृषी विभागामार्फत चिकू झाडांवरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प अंतर्गत प्रत्येक आठवड्यात तालुक्यातील चिकू बागेत भेटी देऊन कीड रोगाचे सर्वेक्षण केले जाते. या महिन्यात फळगळ रोगाचे प्रमाण वाढल्याने या प्रकल्पाचे तालुका निरीक्षक सुनील बोरसे यांच्यासह पथकाने भेट दिली. उपविभागीय कृषी अधिकारी डी.एस. नेरकर, दापोली कृषी विद्यापीठाच्या पालघर येथील कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. एस.बी. गंगावणे, प्रा. अंकुश ढाणे, प्रा. लहानू गबाले, कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ प्रा. उत्तम सहाणे तसेच प्रभारी तालुका कृषी अधिकारी उमेश पवार यांनी पाहणी केली.
मागील वर्षीही पावसाळ्यात चिकूवर रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. त्या वेळी शास्त्रज्ञांनी रोग नियंत्रणासाठी उपाय सुचवले होते. त्याची अंमलबजावणी करणाºया शेतकºयांच्या बागांमध्ये काही प्रमाणात रोग नियंत्रण झाल्याचे दिसून आले. अन्य शेतकºयांच्या बागांमध्ये फळगळ झाल्याचे आढळले. फायटोप्थोरा या बुरशीजन्य रोगामुळे २० ते ८० टक्के नुकसान झाले आहे. याकरिता योग्य वेळी उपाययोजना करण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले. रोग निवारण करताना बुरशीनाशक वापरण्यासह झाडांची प्रतिकार शक्ती वाढवली पाहिजे. यासाठी माती परीक्षणानुसार खत व पाण्याचे नियोजन करणे, पावसाळ्याच्या दिवसात बागेतील पाण्याचा योग्य निचरा करणे, जमिनीत जैविक बुरशीनाशकांचा वापर करणे व झाडावर रासायनिक बुरशीनाशके वापरणे गरजेचे असल्याचे उपाय सुचविण्यात आले आहेत.