ठाणे विकासाचे खणखणीत नाणे असल्याचे सिद्ध करा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 10:47 AM2024-09-22T10:47:52+5:302024-09-22T10:47:59+5:30
ठाणे विकास परिषद २०२४ चा समारोप
ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला जागतिक आर्थिक महासत्ता बनविण्याचे स्वप्न पाहिले आहे. महाराष्ट्र हे देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ आहे, तर मुंबई महानगर प्रदेश हे महाराष्ट्राचे ‘ग्रोथ इंजिन’ आहे. देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरची करायची तर मुंबई महानगर प्रदेशाची क्षमता १.५ ट्रिलियन डॉलरची आहे. ठाणे जिल्ह्याचे अर्थव्यवस्थेतील योगदान ४८ बिलियन डॉलरचे आहे. २०३० पर्यंत ते १५० बिलियन डॉलरइतके करण्याचे निश्चित केले आहे. ठाणे हे विकासाचे खणखणीत नाणे आहे, हे सिद्ध करायचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी केले.
जागतिक आर्थिक केंद्र निर्माण करण्याचे लक्ष्य
‘ठाणे विकास परिषद २०२४’च्या समारोपप्रसंगी ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर सभागृहातील कार्यक्रमात शिंदे बोलत होते. शिंदे म्हणाले, निती आयाेगाने मुंबई महानगराला जागतिक आर्थिक केंद्र निर्माण करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे.
ठाणे जिल्ह्याचा जीडीपी ७.५ टक्के आहे. ताे पुढील ३० वर्षांत २० टक्के करण्याचे लक्ष्य आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी असली, तरी ठाण्यात काय क्षमता आहे, ते ठाणेकरांनाच माहीत नव्हते.
विदेशी गुंतवणुकीच्या ५२ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात
महाराष्ट्र जीडीपी, औद्योगिक प्रगती, विदेशी गुंतवणूक, पायाभूत सुविधा प्रकल्प या सर्वच बाबतींत देशात आघाडीवर आहे.
देशातील एकूण विदेशी गुंतवणुकीच्या ५२ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे, याकडे शिंदे यांनी लक्ष वेधले.
राज्याच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात सात ते आठ तासांत पोहोचता आले पाहिजे, असा आमचा प्रयत्न आहे.
सरकारने पाच लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार केले. त्यापैकी ८० टक्के गुंतवणुकीच्या करारांची अंमलबजावणी केल्याचा दावा शिंदे यांनी केला.
... म्हणून वेदांत प्रकल्प राज्याबाहेर गेला
वेदांत कंपनीचा प्रकल्प महाराष्ट्रातून परराज्यात जाण्यास तत्कालीन महाविकास आघाडी सरकार कारणीभूत असल्याचा आरोप शिंदे यांनी केला.
महाविकास आघाडी सरकारने त्या प्रकल्पाला सहकार्य न केल्याने तो महाराष्ट्रातून गेला, असा दावा त्यांनी केला.
हा एकनाथ शिंदे लवकरच महाविकास आघाडीचे सरकार बदलून टाकणार आहे, याची त्या कंपनीला पूर्वकल्पना असती तर ते महाराष्ट्र सोडून गेेले नसते, अशी टिप्पणीही त्यांनी केली. आमचे सरकार स्पीड ब्रेकर टाकणारे नव्हे, तर ते स्पीड ब्रेकर काढणारे आहे, असेही ते म्हणाले.