काँक्रिटचा रस्ता ठरतोय पालिकेसाठी डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2019 11:48 PM2019-11-07T23:48:17+5:302019-11-07T23:48:24+5:30
बैठकीत काढणार तोडगा : मार्किंगवरून बांधकाम व्यावसायिकांमध्ये वाद
अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिका हद्दीतील जांभूळफाटा ते जांभूळ गावाकडे जाणारा रस्ता हा पालिकेला डोकेदुखी ठरत आहे. या रस्त्याचे काम एमएमआरडीएमार्फत होत असले, तरी या रस्त्याचे मार्किंग देण्याची जबाबदारी ही पालिकेची आहे. मात्र, या ठिकाणी दोन बांधकाम व्यावसायिकांचा रस्त्याच्या मार्किंगवरून वाद सुरू आहे. तर, काही स्थानिकांनीही त्याला विरोध केला आहे. त्यामुळे हा रस्ता मार्किंगअभावी रखडला आहे.
या रस्त्याच्या कामाबाबत मुख्याधिकाऱ्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना पुढाकार घेऊन निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. एमएमआरडीए आणि पालिकेचे अधिकारी यांच्यात बैठक घेऊन या रस्त्याचा तिढा सोडविण्यात येणार आहे. अंबरनाथ पालिकेच्या हद्दीतील जांभूळफाटा ते जांभूळ गाव हा रस्ता एमएमआरडीएमार्फत सुरू आहे. या रस्त्याच्या कामादरम्यान काही अतिक्रमण तोडावे लागणार असल्याने पालिकेने पुढाकार घेत मार्किंग देऊन त्यानुसार काम करणे अपेक्षित होते. मात्र, पालिकेने सुरुवातीला केलेल्या मार्किंगला विरोध झाल्याने पुन्हा नव्याने मार्किंग देण्यात आले. मात्र, त्या मार्किंगलाही विरोध झाला आहे. विकास आराखड्याप्रमाणे रस्त्याला मार्किंग देणे गरजेचे होते. मात्र, अधिकाºयांनी एकाच रस्त्यासाठी दोन मार्किंग दिल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. त्यातच, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दोन वेगवेगळे बांधकाम व्यावसायिक असल्याने ते आपल्या जागेतून रस्ता जाणार नाही, याची दक्षता घेत आहे. रस्त्याला लागून असलेली आपली मालकी हक्काची जागा जाणार, या भीतीने आता दबावतंत्राचा वापर केला जात आहे. मात्र, याच दबावामुळे रस्त्याचे काम पूर्ण थांबले आहे. बांधकाम व्यावसायिकांच्या दबावाबरोबरच या ठिकाणी रस्त्याला लागून असलेल्या काही घरांचेही नुकसान होणार असल्याने तो प्रश्न निकाली काढणे अवघड जात आहे. रस्ता जांभूळफाटा येथून सुरू करण्याऐवजी जांभूळ गावाच्या दिशेने रस्ता सुरू केल्याने त्यालाही विरोध होत आहे. वादात सापडलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर होण्याची गरज आहे.
काम लवकरच सुरू होणार
यासंदर्भात पालिकेचे शहर अभियंता अशोक पाटील यांना विचारले असता त्यांनी रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले. यासंदर्भात एमएमआरडीएचे अधिकारी आणि पालिकेचे अधिकारी यांची बैठक घेऊन या रस्त्यावरील सर्व अडचणी दूर केल्या जाणार असल्याचे स्पष्ट केले.