काँक्रिट रस्ते कापण्याचे काम
By Admin | Published: May 16, 2017 12:08 AM2017-05-16T00:08:00+5:302017-05-16T00:08:00+5:30
शहरातील डांबरी रस्त्यांचे खोदकाम मोठ्या प्रमाणात केले जात असतानाच आता शहरातील काँक्रिट रस्तेही कापण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. फोर जी च्या नावाने मोबाइल कंपन्या थेट
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबरनाथ : शहरातील डांबरी रस्त्यांचे खोदकाम मोठ्या प्रमाणात केले जात असतानाच आता शहरातील काँक्रिट रस्तेही कापण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. फोर जी च्या नावाने मोबाइल कंपन्या थेट काँक्रिट रस्ते कापून त्यात केबल टाकत आहेत. विशेष म्हणजे हे रस्ते कापण्यासाठी पालिकेची कोणतीच परवानगी घेण्यात आलेली नाही.
अंबरनाथमध्ये याआधी फोर जी च्या नावाने शहरात अनेक रस्त्यांचे खोदकाम करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी काँक्रिट रस्तेही कापण्यात आले. या सर्व कामांना पालिकेने मंजुरी दिलेली असली तरी त्या मंजुरीत काँक्रिट रस्ते खोदण्याची किंवा कापण्याची कोणतीच परवानगी देण्यात आलेली नाही. असे असतानाही आता नव्याने एका मोबाइल कंपनीने शहरातील काँक्रिट रस्त्यांचे खोदकाम सुरू केले आहे.
येथील शिवसृष्टी परिसरात या कंपनीने रस्ता मशीनद्वारे कापून त्यातून केबल टाकण्याचे काम सुरू केले आहे. या कामासाठी पालिकेची कोणतीच परवानगी घेण्यात आलेली नाही. रस्ते कापत असताना सुरक्षेची कोणतीच साधने वापरलेली नाहीत. त्यामुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
अंबरनाथ पालिकेत रस्ता खोदण्यासाठी मोबाइल कंपन्यांनी रीतसर पैसे भरून परवानगी घेतली आहे. मात्र, ही परवानगी शहरातील डांबरी रस्त्यांसाठी आहे. तर, काही ठिकाणी काँक्रिटच्या शेजारी असलेल्या पेव्हरब्लॉक तोडण्याची आहे. ते काम झाल्यावर त्याची दुरुस्ती करण्याची जबाबदारी ही पालिकेची आहे. असे असले तरी संबंधित कंपनी थेट काँक्रिटचा रस्ता कापून काम करत आहेत.