मिसिंग लिंकसह कोंडीचा घेतला आढावा; ठाण्यात पे ॲण्ड पार्किंगचे पुन:र्सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 01:41 AM2021-02-13T01:41:55+5:302021-02-13T01:42:03+5:30
१५ मार्चपर्यंत जागा निश्चित करण्याचे आयुक्तांचे निर्देश
ठाणे : शहरातील वाहतूककोंडीची समस्या सोडविण्यासाठी ठाणे महानगरपालिका आणि वाहतूक पोलीस शाखा यांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना देतानाच शहरात पार्किंगकरिता प्रभाग समितीनिहाय १५ मार्चपर्यंत जागांचे पुनसर्वेक्षण करून पे ॲण्ड पार्किंगसाठी जागा निश्चित करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी साहाय्यक आयुक्त आणि कार्यकारी अभियंता यांना शुक्रवारी दिले.
रस्त्यांवर उभ्या असणाऱ्या लक्झरी बस पार्किंगसाठी जागा शोधून आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. सद्य:स्थितीत शहरात वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूककोंडीची समस्या भेडसावत आहे. यामुळे वाहतूककोंडीसह मिसिंग लिंकचा शर्मा यांनी वाहतूक पोलीस आणि महापालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा घेऊन चर्चा केली. शहरात ज्या ठिकाणी गतिरोधक नाहीत त्या ठिकाणी तत्काळ ते टाकण्याच्या सूचना बांधकाम विभागास दिल्या. विशेषत: उपवन परिसरात ज्या ठिकाणी वाहने भरधाव वेगाने चालविली जातात त्या ठिकाणी प्राधान्याने गतिरोधक बसविण्याचे निर्देश त्यांनी दिले.
या बैठकीमध्ये एमएमआरडीए आणि एमएसआरडीसीशी समन्वय साधून रस्त्यांवरील झेब्रा क्रॉसिंग, स्पॉट लाईट, गतिरोधक टाकणे, रस्त्याची निगा व देखभाल, दुचाकीकरिता साईन बोर्ड, कार पार्किंग साईन बोर्ड, नो पार्किंग, नो एन्ट्री बोर्ड स्थानिक रहिवाशांना विश्वासात घेऊन लावणे, मिसिंग लिंक, रस्त्यांवरील भंगार व बेवारस वाहने, विविध ठिकाणी पार्किंगचे पिवळे व पांढरे पट्टे नव्याने मारणे आदी कामे तत्काळ करण्यास सांगितले.
या बैठकीस या वेळी वाहतूक पोलीस विभागाचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्यासह वाहतूक विभागाचे आणि महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.