गाेदामांची दुरवस्था अन् भाताची नासाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:44 AM2021-09-06T04:44:26+5:302021-09-06T04:44:26+5:30
भातसानगर : शहापूर तालुक्यात महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिक २ उपप्रादेशिक कार्यालयाकडून खरेदी करण्यात आलेले भात ...
भातसानगर : शहापूर तालुक्यात महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिक २ उपप्रादेशिक कार्यालयाकडून खरेदी करण्यात आलेले भात ठेवलेल्या गाेदामांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या भाताची माेठ्या प्रमाणात नासधूस झाली आहे. शेतकऱ्यांना भातविक्री करताना योग्य भाव मिळावा, व्यापाऱ्यांकडून त्यांची पिळवणूक थांबावी, या उद्देशाने ही भातखरेदी केली जाते. हा भात भरडाई करून रेशनिंगमध्ये विकला जातो. त्यासाठीचा कालावधीही ठरलेला असतो. मात्र, तालुक्याच्या गोडावूनची स्थिती अतिशय वाईट असल्याने, भात खराब होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. तालुक्यात गेल्या वर्षीच्या हंगामात तीन लाख ५५ हजार क्विंटल भात या आदिवासी विकास महामंडळाच्या शहापूरमधील भात केंद्रांवर खरेदी करण्यात आला. त्याची किंमत सरकारी भावानुसार ६६ कोटी ४० लाख ९४ हजारांच्या आसपास आहे. हा भात भरडाईसाठी तीन महिन्यांत नेणे हा शासकीय नियम असताना, अजूनही हा भात गोदामांत पडून आहे. केवळ एक लाख २० हजार क्विंटल भात आतापर्यंत भरडाईसाठी नेला आहे. पावसामुळे बहुतांशी गोदामांतील भात भिजून गेला आहे. त्यातच उंदीर, घुशी या भाताची नासधूस करीत आहेत. त्याचा नाहक त्रास कर्मचारी व अधिकारी यांना सहन करावा लागत आहे. त्यांना लाखोंच्या नुकसानीच्या नोटिसा बजावण्यात आल्याने काम तरी कसे करायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला आहे.