शाळांची अवस्था दयनीय, तरीही हॅण्डवॉशसाठी दीड कोटींची उधळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 01:35 AM2019-06-19T01:35:26+5:302019-06-19T06:52:04+5:30
शिक्षण विभागाचा प्रस्ताव; महासभेच्या मंजुरीची प्रतीक्षा
ठाणे : ठाणे महापालिका शाळांमधील पटसंख्या दिवसेंदिवस घसरत आहे. इमारतींची अवस्था तशी फार चांगली नसून स्वच्छतागृहांची दैना झाली आहे. भिंतीचे पोपडे निघत आहेत, अनेक शाळांचा पुनर्विकास रखडलेला आहे, पटसंख्या कमी झाल्याने अनेक वर्ग बंद करण्यात येत आहेत, असे असताना शाळांचा दर्जा उचांवण्याऐवजी शिक्षण विभागाने जे विद्यार्थी शाळेत शिल्लक आहेत, त्यांचे किमान हात स्वच्छ राहावेत या उद्देशाने हॅण्डवॉशच्या नावाखाली १ कोटी ३९ लाखांची उधळण करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे.
ठाणे महापालिका शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा पट हा मागील काही वर्षांत खालावलेला आहे. ३७ हजारांहून अधिक असलेली विद्यार्थ्यांची संख्या ही ३० हजारांच्या आसपास घसरली आहे. शाळेच्या इमारतींची अवस्था नाजुक झाली आहे, स्वच्छतागृहांची अवस्थाही न बघितलेलीच बरी. असे असताना आता हॅण्डवॉशचा नवा फॉर्मुला शिक्षण विभागाने पुढे आणला आहे. विद्यार्थ्यांना स्वच्छतेची सवय लागून त्यांचे आरोग्य सृदृढ राहावे यासाठी प्रत्येक शाळेच्या इमारतीत हर्बल हॅण्डवॉश जेल पुरविण्याची गरज असल्याचे शिक्षण विभागाने आपल्या प्रस्तावात नमूद केले आहे.
असा करणार खर्च : पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग ७८ इमारतींमध्ये भरत आहेत. प्रत्येक मजल्यावरील स्वच्छतागृहांच्या शेजारी किमान २९० हॅण्डवॉश डिस्पेन्सर मशिनची गरज असल्याचे म्हटले आहे. एका यंत्रात एक लिटर जेल असून तो संपल्यानंतर पुन्हा भरला जाणार आहे. पालिकेच्या १२० प्राथमिक आणि २१ माध्यमिक शाळांसाठी दरमहा प्रति युनिट दोन लिटर जेल लागेल, असा अंदाज शिक्षण विभागाने बांधला आहे. त्यात उन्हाळी आणि हिवाळी सुटी वगळण्यात आली, हे नशीब म्हणावे लागणार आहे.
सुट्यांचे हे महिने वगळता उर्वरीत १० महिने शाळा कार्यरत असते. महिन्याकाठी ५८० याप्रमाणे १० महिन्यांसाठी ५ हजार ८८०० पाऊच लागतील, असा अंदाज बांधण्यात आला आहे. त्यानुसार मशिनच्या खरेदीसाठी २ लाख २२ हजार रु पये लागणार असून दोन वर्षांत ११ हजार ६०० पाऊचसाठी १ कोटी ३७ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित धरला आहे. यासाठी १ कोटी ३९ लाखांचा खर्च केला जाणार आहे. विशेष म्हणजे अशा सुपीक कल्पनासाठी पालिकेने अर्थसंकल्पात तब्बल २१ कोटी ६९ लाखांची तरतूद केली आहे.