गृहनिर्माण संस्था, गृहसंकुलांमध्ये लसीकरण मोहीम राबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:42 AM2021-05-08T04:42:11+5:302021-05-08T04:42:11+5:30
ठाणे : ठाणे महानगरपालिकेतील स्थायी समिती सभापती संजय देवराम भोईर यांनी ठाणे शहरातील गृहनिर्माण संस्था, गृहसंकुलांमध्ये लसीकरण मोहीम राबविण्यासाठी ...
ठाणे : ठाणे महानगरपालिकेतील स्थायी समिती सभापती संजय देवराम भोईर यांनी ठाणे शहरातील गृहनिर्माण संस्था, गृहसंकुलांमध्ये लसीकरण मोहीम राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली आहे. आयुक्तांना ५ मे रोजी पत्र लिहून त्यांनी ठाणे महापालिकेने तातडीने केंद्र आणि राज्य सरकारची आवश्यक परवानगी घेऊन तत्काळ पुढाकार घ्यावा, असे म्हटले आहे.
अशाप्रकारची लसीकरण मोहीम मुंबई महानगरपालिकेद्वारे योजली जात असून, त्यासाठी गृहनिर्माण संस्था, गृहसंकुले, बँका, औद्योगिक वसाहती, बड्या कंपन्या यांच्याशी सहकार्यासाठी बोलणी सुरू केली आहेत, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर लसीकरण हाच प्रभावी उपाय आहे आणि तिसऱ्या लाटेपूर्वी कमाल नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. मात्र, महानगरपालिकेने ठरवून दिलेल्या केंद्रावरच केवळ ही मोहीम राबविली, तर गर्दी होण्याची आणि बराच वेळ लागण्याची दाट शक्यता आहे.
....
गृहनिर्माण संस्था, गृहसंकुले, क्लब हाऊस याठिकाणी या मोहिमा राबविल्या गेल्या, तर १८ वर्षे ते वयोवृद्ध नागरिक या सर्वांचीच सोय होणे शक्य होणार आहे. गर्दी आणि रांगा यावर यातून हमखास उपाय मिळेल. त्यासाठी खासगी डॉक्टर, नर्सेस, रुग्णालये व त्यांच्या संघटना यांचे सहकार्य घेता येईल. त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारशी आवश्यक परवानग्यांसाठी तत्काळ बोलणी सुरू करावी.”
संजय भोईर, सभापती,स्थायी समिती, ठामपा