कोकण प्रादेशिक विभागात 'शून्य थकबाकी' मोहिम राबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 06:05 PM2020-01-14T18:05:42+5:302020-01-14T18:06:32+5:30
विभागातील अधिकाऱ्यांना निर्देश
कल्याण:महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागात डिसेंबर-२०१९ अखेर वीजबिल वसुलीचे निर्धारीत उद्दिष्ट आणि प्रत्यक्ष वसुली यात जवळपास ९ टक्क्यांची तफावत आढळून आली आहे. वसुलीचे लक्ष्य शंभर टक्के गाठण्यासाठी 'शून्य थकबाकी' मोहीम राबवून मार्च-२०२० पर्यंत कोकण प्रादेशिक विभाग वीजबिल थकबाकी मुक्त करावा, असे सक्त निर्देश विभागाचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिले आहेत.
प्रादेशिक संचालक नाळे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून विभागातील कल्याण, भांडुप, रत्नागिरी, नाशिक आणि जळगाव परिमंडलांचे मुख्य अभियंता, सर्व अधीक्षक अभियंते आणि कार्यकारी अभियंते यांच्यासमवेत नुकत्याच घेतलेल्या आढावा बैठकीत विविध निर्देश दिले. महावितरणच्या एकूण महसुलात जवळपास ४३ टक्के योगदान देणाऱ्या कोकण विभागाच्या वसुलीतील ९ टक्के फरक हा गंभीर परिणाम करणारा आहे. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळाचा कार्यक्षम वापर करावा व वसुलीचे निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करून थकबाकी शून्यावर आणावी. मुख्य कार्यालयाकडून येणाऱ्या यादीतील सर्व थकबाकीदारांचा वीजपुरवठा त्वरित खंडित करावा.
लघुदाब वाहिनीवरील वीजहानीचे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. वीजचोरांविरुद्ध सुरु असलेली मोहीम आणखी तीव्र व व्यापक करावी. वीजपुरवठा खंडित होण्याचे विशेषतः औद्योगिक क्षेत्रातील प्रमाण कमी करावे. नादुरुस्त रोहित्र दुरुस्त करून तातडीने बदलावेत. सिंगल फेज मीटर पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून प्रलंबित नवीन वीजजोडणी वेळेत द्यावी.
मार्च-२०२० पर्यंतच्या नियोजित देखभाल व दुरुस्तीसाठी वीज बंद ठेवण्याबाबतची माहिती प्रणालीत भरावी. जेणेकरून ग्राहकांना वीज बंद संदर्भात 'एसएमएस'द्वारे लवकर पूर्वकल्पना देता येईल. कृषी वाहिन्यांवरील विद्युत भारात वाढ होत असून अशा वाहिन्यांवर अनधिकृत वीज वापर होणार नाही याची दक्षता घ्यावी. उच्चदाब वितरण प्रणाली योजनेतून (HVDS) उर्वरित कृषिपंपांना वीजजोडणी देण्याच्या कामांना गती देण्याबाबत निर्देश श्री. नाळे यांनी दिले. विविध योजनांमधून सुरु असलेल्या कामांच्या प्रगतीचा आढावाही त्यांनी घेतला.
कोकण प्रादेशिक विभागात कल्याण, भांडुप, रत्नागिरी, नाशिक आणि जळगाव परिमंडलांतील १५ जिल्ह्यांचा समावेश होतो. डिसेंबर-२०१९ अखेर विभागात विजबिलाची ५५७ कोटी रुपयांची थकबाकी असून थकीत बिलाच्या वसुलीसाठी १ जानेवारीपासून आतापर्यंत १९ हजार २२८ ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरता किंवा कायमचा खंडित कारण्यात आला आहे. तर नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात विभागात विजेचा चोरटा तसेच अनधिकृत वापर करणाऱ्या १ हजार ३७१ जणांविरुद्ध कारवाई करून ८ कोटी १० लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आणण्यात आली. यातील ८४३ जणांकडून १ कोटी ५१ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
मुख्य अभियंते सर्वश्री दिनेश अग्रवाल, ब्रिजपालसिंह जनवीर, दीपक कुमठेकर, श्रीमती पुष्पा चव्हाण व रंजना पगारे यांच्यासह कोकण प्रादेशिक विभागातील सर्व अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते आढावा बैठकीला उपस्थित होते.
वीजबिल वेळेत भरा
वीजबिल थकित ठेवणाऱ्या ग्राहकांची यादी मुख्य कार्यालयाकडून विशिष्ट प्रणालीमार्फत क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात येते. त्यानुसार संबंधित ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करून त्याची माहिती या प्रणालीद्वारे मुख्य कार्यालयाला कळवली जाते. पुनरजोडणी शुल्क भरून प्रतीक्षा केल्याशिवाय संबंधितांचा वीजपुरवठा पूर्ववत केला जात नाही.
कोकण प्रादेशिक विभागात गेल्या १५ दिवसात थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केलेल्या १७ हजार २६२ ग्राहकांनी २२ लाख रुपयांचे पुनःर्जोडणी शुल्क भरल्यानंतरच त्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. त्यामुळे विजबिलाचा वेळेत भरणा करून संभाव्य गैरसोय टाळावी व महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन प्रादेशिक संचालक श्री. अंकुश नाळे यांनी कोकण प्रादेशिक विभागातील नागरिकांना केले आहे.