सांस्कृतिक नगरीतच मनोरंजनाचा ठणठणाट; आचार्य अत्रे रंगमंदिर वर्षभरापासून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 12:19 AM2018-09-07T00:19:22+5:302018-09-07T00:19:35+5:30
देखभाल दुरुस्तीसाठी कल्याण येथील आचार्य अत्रे रंगमंदिर तब्बल वर्षभरापासून बंद असताना आता डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचा पडदाही शुक्रवारपासून पडणार आहे.
- प्रशांत माने
कल्याण : देखभाल दुरुस्तीसाठी कल्याण येथील आचार्य अत्रे रंगमंदिर तब्बल वर्षभरापासून बंद असताना आता डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचा पडदाही शुक्रवारपासून पडणार आहे. नाट्यगृहाला टाळे लागल्याने सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख असलेल्या कल्याण-डोंबिवलीत मनोरंजनाचा ठणठणाट झाला असून त्यामुळे रसिकांचा हिरमोड झाला आहे.
कल्याण येथील सावित्रीबाई नाट्यगृह दुरुस्तीसाठी बंद करून वर्ष उलटले. मात्र, प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली नव्हती. दुरुस्तीच्या निविदेला योग्य तो प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे काम सुरू व्हायला विलंब लागत होता. अखेर, या कामाचे तीन टप्प्यांत विभाजन करण्यात आले आणि त्याप्रमाणे प्रत्येक कामाची स्वतंत्रपणे निविदा मागवल्यानंतर कंत्राटदारांचा प्रतिसाद मिळाला. आता दुरुस्तीचे काम पूर्ण होत आले असून केवळ रंगरंगोटीचे काम बाकी आहे. २८ आॅगस्टला अभिनेते, दिग्दर्शक आणि नाट्यकलाकार संघाचे अध्यक्ष प्रदीप कबरे यांनी रंगमंदिराच्या कामाची पाहणी केली होती. या कामाबाबत समाधान व्यक्त करताना कामाला विलंब लागला तरी चालेल, पण कोणत्याही त्रुटी राहता कामा नये, अशा सूचना त्यांनी केल्या होत्या. दरम्यान, मंगळवारी महापौर विनीता राणे आणि शहरअभियंता प्रमोद कुलकर्णी यांनी अत्रे रंगमंदिराची पाहणी करून कामाचा आढावा घेतला. काम जवळपास पूर्ण होत आल्याने १ आॅक्टोबरला म्हणजेच केडीएमसीच्या वर्धापनदिनी हे नाट्यगृह रसिकांसाठी खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुषंगाने अत्रे रंगमंदिर व्यवस्थापनाकडून तारखांचे वाटपही करण्यात आले आहे.
गणेशोत्सवादरम्यान होणार फुले नाट्यगृहाचे काम, वातानुकूलित यंत्राचीही दुरूस्ती
सावित्रीबाई फुले नाट्यगृहामधील वातानुकूलित यंत्र नादुरुस्त झाल्याने दिवाळीपासून भाडेतत्त्वावर घेतलेल्या वातानुकूलित यंत्रावर काम सुरू होते. ही मुदत शुक्रवारी संपुष्टात येत असल्याने शनिवारपासून नाट्यप्रयोग आणि अन्य कार्यक्रमांसाठी नाट्यगृह देण्यात येऊ नये, अशा सूचना प्रशासनाकडून व्यवस्थापनाला देण्यात आल्या होत्या. त्यामुळे त्यांच्याकडून ७ सप्टेंबरपर्यंतच नाट्यगृह खुले ठेवण्यात आले आहे. शनिवारपासून याठिकाणी नाट्यप्रयोग अथवा कार्यक्रम होणार नाही. याच महिन्यात गणेशोत्सव आहे. या कालावधीत शक्यतो नाट्यप्रयोग होत नाहीत. त्यामुळे महापालिका या काळात हे काम उरकून घेणार आहे. परिणामी नाट्यगृह बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून याचदरम्यान वातानुकूलित यंत्राचे कामही केले जाणार आहे. या कामाला तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. यासंदर्भात केडीएमसीचे शहरअभियंता प्रमोद कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी भाडेतत्त्वावर घेतलेल्या वातानुकूलित यंत्रांची मुदत संपल्याने नाट्यगृह बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.
केमिकल झोनचा फटका : फुले नाट्यगृह एमआयडीसी भागात आहे. येथील रासायनिक कंपन्यांकडून होणाऱ्या प्रदूषणामुळे नाट्यगृहातील वातानुकूलित यंत्रे लवकर नादुरुस्त झाल्याचे बोलले जाते. त्यामुळे आता येथे अत्रे रंगमंदिराच्या धर्तीवर चिलर वातानुकूलित यंत्र बसवण्यात येणार आहे.