मुंब्य्रात मतदानाच्या वेळेबाबत संभ्रम
By admin | Published: February 14, 2017 02:53 AM2017-02-14T02:53:22+5:302017-02-14T02:53:22+5:30
शासकीय परिपत्रक आणि राजकीय नेत्यांच्या होर्डिंगवर मतदानाच्या वेगवेगळ््या वेळा लिहिलेल्या आहेत. त्यात तब्बल अर्ध्या तासाचा फरक
मुंब्रा : शासकीय परिपत्रक आणि राजकीय नेत्यांच्या होर्डिंगवर मतदानाच्या वेगवेगळ््या वेळा लिहिलेल्या आहेत. त्यात तब्बल अर्ध्या तासाचा फरक आहे. यामुळे मतदानाची नेमकी वेळ काय, याबाबत मुंब्य्रातील मतदारांत गोंधळ निर्माण झाला आहे. मतदान सकाळी सातला सुरू होणार की साडेसातला हा मुद्दा संभ्रमाचे कारण आहे.
या गोंधळाचा फटका मतदानाला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. आठ दिवसांनी होणाऱ्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी शासकीय परिपत्रकात सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच ही वेळ मतदानासाठी दाखवली आहे. परंतु अनेक उमेदवारांनी त्यांच्या हंगामी कार्यालयावरील बॅनरवर ही वेळ सकाळी सात ते संध्याकाळी पाच असल्याचे लिहिले आहे. त्यामुळे मतदान सुरू होण्याच्या आणि संपण्याच्या वेळेत तब्बल अर्ध्या तासाचा फरक पडतो आहे. मतदानाच्या दिवशी शेवटच्या आणि पहिल्या सत्रातील वेळेला अनन्यसाधारण महत्त्व असते. मतदान सुरू होण्याच्या वेळेला गर्दी होते, तशीच ती संपतानाही होते. अनेकदा रांगा लागतात. तीच वेळ चुकत असल्याने मतदानावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)