ठाण्यात लसीकरण केंद्रावर पुन्हा गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:43 AM2021-04-28T04:43:34+5:302021-04-28T04:43:34+5:30
ठाणे : कमी अधिक प्रमाणात लसींचा साठा उपलब्ध होत असल्याने ठाणे महापालिकेच्या माध्यमातून लसीकरण केंद्र देखील कमी ...
ठाणे : कमी अधिक प्रमाणात लसींचा साठा उपलब्ध होत असल्याने ठाणे महापालिकेच्या माध्यमातून लसीकरण केंद्र देखील कमी अधिक प्रमाणात सुरू ठेवली जात आहेत. त्यातही मंगळवारी शहरातील ५६ पैकी केवळ २६ केंद्रच सुरू ठेवल्याने अनेक केंद्रावर गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. महापालिकेच्या वाडिया येथील केंद्रावर ४० टोकन दिले जातील, असे सांगितले जात असताना प्रत्यक्षात ३० टोकनच दिल्याने येथे अनेकांनी गोंधळ घातला. त्यातही या ठिकाणी कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस दिला जात असल्याचे फलक लावल्याने अनेक नागरिकांनी पुन्हा परतीचा मार्ग स्वीकारला. शहरातील इतर केंद्रावर देखील अशी परिस्थिती होती.
येत्या १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांनाच लस दिली जाणार आहे. परंतु, त्यानंतर आपल्याला लस मिळविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागेल असे चित्र असल्याने ज्येष्ठांसह ४५ वर्षांवरील नागरिकांनी काही दिवसापासून लसीकरण केंद्रावर गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. त्यातही लसींचा अपुरा पुरवठा होत असल्याने महापालिका देखील सर्वच केंद्र सुरू ठेवत नसल्याचे दिसत आहे. सोमवारी २० हजार लस मिळाल्या असल्या तरी त्या दोन ते तीन दिवस पुरविण्यासाठी महापालिकेने नियोजन केले आहे. परंतु, त्यामुळे शहरातील केंद्राची संख्या कमी होऊ न त्याचा परिणाम जे केंद्र सुरू आहेत, त्या ठिकाणी गर्दी केली जात आहे. यापूर्वी येणाऱ्या प्रत्येकाला लस दिली जात होती. आता प्रत्येक केंद्रावर टोकन दिली जात असून कुठे ४० तर कुठे ५० अशाच स्वरुपात ही टोकन सिस्टम सुरू आहे. त्यामुळे उर्वरित नागरिकांनी रांगेत उभे न राहता घरचा रस्ता धरावा असाच त्याचा अर्थ होत आहे. असे असताना आपल्या कोरोनापासून रोखण्यासाठी लस घेणे गरजेचे असल्याने नागरिक केंद्रावर गर्दी करीत आहेत.
मंगळवारी त्यानुसार शहरात अवघी २६ केंद्र सुरू होती. त्याठिकाणी टोकन पद्धत ठेवून उर्वरितांना घरी पाठविले जात होते. विशेष म्हणजे लस मिळावी यासाठी वाडिया दवाखान्याबाहेर पहाटे पाच पासून नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. परंतु, सकाळी त्याठिकाणी केवळ कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस दिला जाणार असल्याचे फलक लावल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. हीच परिस्थिती सिव्हिल रुग्णालयाच्या ठिकाणी देखील दिसून आली. या ठिकाणीही नागरिकांनी लस घेण्यासाठी भली मोठी रांग लावली होती. शहरातील इतर सुरू असलेल्या केंद्रावर देखील अशीच परिस्थिती होती.