कोपर पूलबंदीवरून गोंधळात गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 01:35 AM2019-05-27T01:35:05+5:302019-05-27T01:35:07+5:30
केडीएमसी आणि रेल्वेने भूमिका स्पष्ट न केल्याने सोमवारपासून उड्डाणपूल बंद होण्याबाबत असलेली संभ्रमावस्था कायम आहे.
डोंबिवली : पूर्व-पश्चिम जोडणारा कोपर उड्डाणपूल बंद करण्याच्या मुद्द्यावर एकीकडे बंदीवर पर्याय काय, असा सवाल केला जात असताना दुसरीकडे केडीएमसी आणि रेल्वेने भूमिका स्पष्ट न केल्याने सोमवारपासून उड्डाणपूल बंद होण्याबाबत असलेली संभ्रमावस्था कायम आहे. वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियोजन केले आहे. त्यानुसार, ठाकुर्ली उड्डाणपूल परिसरातील मार्गांत त्यांनी बदल केले.
कोपर उड्डाणपूल सोमवारपासून बंद करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. या पुलावरील वाहतूक बंद केली, तर त्या वाहतुकीला सक्षम पर्याय नसल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीतीही व्यक्त होत आहे. ठाकुर्ली येथील उड्डाणपूल हा पर्याय तेवढा सोयीस्कर नाही. ज्या वेळेला शाळा सुरू होतील, त्या वेळेस वाहतुकीची स्थिती अधिकच भयावह असेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
उड्डाणपूल बंद करण्याच्या रेल्वेच्या निर्णयास महापालिका अनुकूल नाही. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद होणार का? याबाबत साशंकता आहे. सोमवारी रेल्वे, केडीएमसी तसेच वाहतूक पोलिसांच्या वतीने उड्डाणपुलाची संयुक्त पाहणी केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. या पाहणीनंतरच पूलबंदीबाबत ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे. पूल बंद करण्यावरून रेल्वे आणि केडीएमसीमधील मतभेद चव्हाट्यावर आले असताना दुसरीकडे वाहतुकीचे नियोजन करणारे वाहतूक पोलीसही संभ्रमावस्थेत आहेत. नेमका हा पूल किती दिवसांसाठी बंद ठेवला जाणार आहे, याचीही माहिती त्यांना नाही. दरम्यान, सक्षम पर्याय नसल्याने पूल बंद करणे परवडणारे नाही. पूल धोकादायक झाल्यावरच रेल्वेला जाग कशी काय येते. त्याच्याआधी पावले का उचलली जात नाहीत. माजी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याशी चर्चा झाली असून सोमवारी ते रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत, असे स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी सांगितले. तर, मनसेचे गटनेते मंदार हळबे म्हणाले की, जर पूल धोकादायक झाला असेल, तर प्रशासन तसेच सत्ताधाऱ्यांनी तातडीने निर्णय घेणे अपेक्षित आहे. या उड्डाणपुलाचा पत्रीपूल होता कामा नये. लवकरात लवकर हे काम मार्गी लागावे, त्यासाठी आम्हाला कालबद्ध कार्यक्रम हवा आहे. त्यासाठी लष्कराकडे या पुलाचे काम द्यावे.
>ठाकुर्ली पूल परिसरातील रस्ते एकदिशा मार्ग
कोपर उड्डाणपूल बंद झाल्यास तेथील वाहतूक ठाकुर्ली उड्डाणपुलावरून वळवण्यात येणार आहे. त्यासाठी या पुलालगतचे पूर्वेकडील रस्ते एकदिशा केले आहेत. पश्चिमेकडील वाहन ठाकुर्ली उड्डाणपुलावरून पूर्वेकडे येताना डावीकडे वळून जोशी हायस्कूल मार्गावरून सरळ जाईल.तर, मंजुनाथ तसेच कानविंदे सभागृहाच्या रस्त्यावरून येणारे वाहन चौकात डावीकडे वळेल आणि ते संभाजी पथ अथवा अप्पा दातार चौकमार्गे नेहरू रोडवरून ठाकुर्ली पुलाकडे जाईल. पश्चिमेकडील वाहतूक मार्गातही बदल केले आहेत. फुले मार्गावरून वाहन ठाकुर्ली उड्डाणपुलाकडे जाईल. ठाकुर्ली पुलाकडून पश्चिमेला उतरणारे वाहन गणेशनगर, नवापाडामार्गे जाईल.
>आम्ही आमची भूमिका रेल्वेला कळवली आहे. पूल बंद करण्याबाबत रेल्वेने एकतर्फी निर्णय घेऊ नये. सर्वांशी चर्चा करूनच याबाबत निर्णय घेतला पाहिजे. सोमवारच्या संयुक्त पाहणीबाबत आपणास काही माहिती नाही.
-गोविंद बोडके,
आयुक्त, केडीएमसी