महापालिकेच्या नियोजना अभावी नाट्यगृहात गोंधळ
By धीरज परब | Published: August 8, 2023 06:52 PM2023-08-08T18:52:05+5:302023-08-08T18:52:56+5:30
नाटकांच्या वेळां वरून उडालेल्या गोंधळास भाषिक आणि राजकीय वळण
लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृहात दोन नाटकांच्या वेळांचे नियोजन ओढूनताणून करण्याचा प्रशासनाचा खटाटोप अंगलट आला आहे . यातून त्याला भाषिक आणि राजकीय वळण लागून नवीन वाद निर्माण झाला आहे .
काशीमीरा महामार्गावर असलेल्या पालिकेच्या लता मंगेशकर नाट्यगृहात तब्बल १० महिन्यांनी पहिले मराठी नाटक झाले . रविवार ६ ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वा. करून गेलो गाव ह्या मराठी नाटकाचा हाऊसफुल्ल प्रयोग झाला . मात्र सदर नाटकाच्या बुकिंग आधीच महापालिकेने त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता राजस्थानी भाषेतील खाटु श्याम नाटकाची बुकिंग कित्येक दिवस आधीच घेऊन ठेवली होती .
वेळ जुळत नसताना देखील महापालिकेच्या संबंधित कर्मचारी - अधिकारी यांनी दोन्ही नाटकांची बुकिंग घेतली . त्यामुळे गोंधळ होणार हे लक्षात आल्यावर खाटु श्याम नाटकाच्या आयोजकांना ५ ऐवजी साडे पाच वाजताची वेळ करा अशी सूचना पालिकेने केली असता आयोजकांनी ती मान्य केली .
परंतु करून गेलो गाव हे नाटकच मुळात अडीज ते पावणे तीन तासांचे असून पहिलाच प्रयोग असल्याने लोकांचा सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद होता . तर दुसरीकडे खाटु श्याम नाटकाचे प्रेक्षक सुद्धा ५ वा . चा प्रयोग आहे म्हणून नाट्यगृहाच्या आवारात जमू लागले . एक तास झाला तरी बाहेर जमलेले प्रेक्षक नाट्यगृहात जाण्याच्या प्रतीक्षेत ताटकळत होते . या मुळे काहीसे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले .
सुमारे ६ . ५ वा . करून गेलो गावचा प्रयोग संपल्या नंतर सव्वा सहाच्या सुमारास खाटू श्यामजी नाटकासाठी आलेल्या प्रेक्षकांना आत मध्ये सोडण्यास सुरवात केली . मुळात मुंबई , ठाणे भागातील नाट्यगृहात नाटकांच्या वेळांचे नियोजन महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जाणून घेणे आवश्यक होते . त्यातच महापालिकेने आधीच खाटू श्याम नाटकाच्या प्रयोगाचे बुकिंग घेतले होते. जर वेळेचे नियोजन जमत नसल्याची पूर्ण कल्पना असताना सुद्धा हा खटाटोप केल्याने वादंग निर्माण झाल्या बद्दल नाट्यरसिकांनी नाराजी व्यक्त केली आहे .
महापालिके कडून रविवार ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वा . राजस्थानी भाषेतील खाटू श्याम नाटका साठी मंगेशकर नाट्यगृहची बुकिंग कित्येक दिवस आधी करण्यात आली होती . मात्र महापालिकेने नंतर मराठी नाटक करून गेलो गाव ला देखील ६ ऑगस्ट रोजीची ३ . ३० वा. ची बुकिंग दिली . वेळेचे नियोजन होत नसताना देखील बुकिंग देऊन गोंधळ व नवीन वाद यातून निर्माण झाला .
५ वा . ची वेळ असताना साडेसहा वाजले तरी खाटू श्याम नाटकासाठी आलेल्या प्रेक्षकांना बाहेरच ताटकळत रहावे लागल्याने आमदार गीता जैन यांनी पालिका कर्मचारी आनंद गबाळे यांची नाट्यगृहात कानउघाडणी करत असले चुकीचे नियोजन केल्या बद्दल संताप व्यक्त केला . गबाळे यांनी चूक झाल्याचे मान्य करत दिलगिरी देखील व्यक्त केली . महापालिकेच्या वेळेच्या नियोजना अभावी हा गोंधळ उडाल्याने संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाईचे पत्र आ . जैन यांनी आयुक्तांना दिले . नाटकांच्या वेळा आणि दोन प्रयोगातले अंतर आदींचा विचार करूनच नाटकांची बुकिंग घेणे आवश्यक असताना अधिकाऱ्यांनी कर्तव्यात जाणीवपूर्वक कसुर करून भाषिक वाद निर्माण होण्याचे वातावरण केले आहे . हि अतिशय गंभीर बाब असल्याचे आ . जैन यांनी सांगितले .
दरम्यान मंगळवारी आमदार प्रताप सरनाईक यांनी शिष्टमंडळासह आयुक्त दिलीप ढोले यांची भेट घेतली . मराठी नाटकाच्या वेळी इतर कोणीही येऊन अशा प्रकारे मराठी नाटकावर अरेरावी करण्याचा प्रयत्न केला , मराठी नाटक बंद पाडण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सहन करणार नाही. रविवारी नाट्यगृहात मराठी नाटकाच्या बाबतीत झालेल्या प्रकारा नंतर मराठी भाषिकात नाराजी आहे. वेळ पडल्यास मराठी भाषिकांसाठी आणि मराठी अस्मितेसाठी रस्त्यावर उतरू , असा इशारा आ . सरनाईक यांनी दिला. मराठी नाट्य चळवळ वाढावी यासाठी , मराठी नाटकांना महापालिकेने नाट्यगृह भाड्यात अधिक सवलत द्यावी तसेच प्रयोगां साठी प्राधान्य द्यावे अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली.