उल्हासनगर महापालिका शिक्षण मंडळात गोंधळ, आयुक्तांकडून झाडाझडती
By सदानंद नाईक | Published: January 14, 2023 01:45 PM2023-01-14T13:45:23+5:302023-01-14T14:17:39+5:30
आयुक्तांकडून झाडाझडती, ६ हजेरीपत्रक, मुलांच्या सोयी-सुविधेकडे दुर्लक्ष
सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिका शिक्षण मंडळाची आयुक्त अजीज शेख यांच्याकडून शुक्रवारी तब्बल तीन तास झाडाझडती घेतल्यावर, मंडळातील अनियमितता उघड झाली. शालेय मुलांना शैक्षणिक साहित्य, गणवेश वेळेत देत नसून पिण्याचे पाणी, शौचालय, मुलांना बसण्याची सुविधा आदी बाबत वानवा असल्याचे उघड झाले.
उल्हासनगर महापालिका शिक्षण मंडळ नेहमी वादात राहिले असून मंडळातील तक्रारी थेट आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्याकडे गेल्या. आयुक्त अजीज शेख यांनी शुक्रवारी वुडलँड येथील शिक्षण मंडळाच्या कार्यालयाला भेट देऊन तीन तास मंडळाची झाडाझडती घेतली. शिक्षण मंडळ कार्यालयात तब्बल ६ हजेरीपत्रक मिळाल्याने, मंडळातील गोंधळी कारभारावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले. आयुक्तांनी एकच हजेरीपत्रक ठेवण्याचे आदेश प्रशासन अधिकाऱ्यांना दिले असून मुलांना शैक्षणिक साहित्य व गणवेष देण्याचे आदेश दिले. अनेक शाळेत मुलांना बसण्यासाठी डेक्स बेंचेस नसल्याचे उघड झाले असून शौचालय, पिण्याचे पाणी, ग्रंथालयाची वानवा आदींच्या सुविधा देण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. शिक्षण मंडळातील कर्मचारी वेळेत येत नसल्याने, मंडळात सावळागोंधळ उघड झाला आहे. आयुक्तांच्या आक्रमक भूमिकेचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
महापालिका शाळांना पूर्वीचे गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी त्याच बरोबर शाळेची गुणवत्ता वाढविण्यावर भर देण्याचा निर्णय आयुक्त शेख यांनी घेतला आहे. शाळा इमारतीची दुरुस्ती, प्रत्येक शाळेत ग्रंथालय, शौचालय, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वेळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप, गणवेष, मुलांना शैक्षणिक सुविधा देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. तसेच लेटलतीफ कर्मचारी व शिक्षकावर कारवाईचे संकेत दिले. मंडळात आढळून आलेल्या सहा हजेरीपत्रकावर प्रश्नचिन्हे उभे करून एकच हजेरीपत्रक ठेवण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. शिक्षण मंडळावर वरिष्ठ अधिकारी, प्रशासन अधिकारी यांचे नियंत्रण राहिले नसल्याने, शाळेत शिकणाऱ्या हजारो मुलांच्या भविष्यावर प्रश्नचिन्हे उभे ठाकल्याची प्रतिक्रिया आयुक्त अजीज शेख यांनी दिली आहे.
महापालिका मुख्यालयात शिक्षण मंडळ हलवा महापालिका शाळेतील हजारो मुलांच्या शैक्षणिक धोरणावर परिणाम टाळण्यासाठी, वुडलँड येथील मंडळाचे कार्यालय महापालिका मुख्यालयात हळविण्याची मागणी होत आहे.