केडीएमसीच्या लसीकरण केंद्रावर गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2021 04:05 AM2021-05-02T04:05:04+5:302021-05-02T04:05:04+5:30
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेने शनिवारी कल्याण पश्चिमेतील आर्ट गॅलरी येथे लसीकरण केंद्र सुरू ठेवले होते. तेथे १८ ते ४५ ...
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेने शनिवारी कल्याण पश्चिमेतील आर्ट गॅलरी येथे लसीकरण केंद्र सुरू ठेवले होते. तेथे १८ ते ४५ वयोगटांतील नागरिकांना लसीकरण केले जाईल. लसीकरणासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणाऱ्यांना लस दिली जाईल, असे आवाहन महापालिकेने केले होते, तरीही लसीकरण केंद्रावर गोंधळ उडाला.
लस घेण्यासाठी जवळपास २०० जणांनी ऑनलाइन रजिस्ट्रेशन केले होते. त्यापैकी केवळ आठ जण केंद्रावर पोहाेचले होते. ज्या नागरिकांनी रजिस्ट्रेशन केले नव्हते. तेही लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर पोहाेचले. त्यांनी पहाटे ४ वाजल्यापासून लसीकरण केंद्राबाहेर रांग लावली होती. सकाळी ८ वाजताच्या सुमारास भलीमोठी रांग पाहून व्यवस्थापनाने त्यांना टोकन दिले होते. त्यांनी टोकन घेऊन रांगेत उभे राहणे पसंत केले. मात्र, दुपारी एक वाजताच्या सुमारास प्रशासनाकडून सांगण्यात आले की, केवळ ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणाऱ्यांनाच लस दिली जाईल. तेव्हा टोकन घेऊन रांगेत उभे असलेल्या नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. लस द्यायचीच नव्हती, तर टोकन देऊन रांगेत कशाला उभे केले, असा संतप्त सवाल रांगेत उभे असलेल्या मयूर महाजन या तरुणाने केला. ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणारे रजिस्ट्रेशन करून लस घेण्यासाठी येणार नसतील, तर ज्यांना टोकन देऊन रांगेत उभे केले आहे, त्यांना लस दिली जावी, अशी मागणी नागरिकांनी केली. प्रशासनाने त्यांची ही मागणी मान्य केली नाही. महापालिकेच्या उपायुक्त पल्लवी भागवत आणि वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप निंबाळकर यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. यावेळी डॉ.निंबाळकर यांनी सांगितले की, २०० जणांनी ऑनलाइन रजिस्ट्रेशन केले होते. २०० डोस केंद्रासाठी उपलब्ध झाले होते. गर्दी झाल्याने रांगेत उभे असलेल्यांना टोकन दिले गेले, तर उपायुक्त भागवत यांनी लसीकरणाचे काम करणाऱ्या एजन्सीची चूक असल्याचे नमूद केले.
फोटो-कल्याण-लसीकरण गोंधळ
-------------------------