दोन चटईक्षेत्रावरून जुन्या ठाण्यातील नागरिकांत संभ्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 11:58 PM2018-07-21T23:58:44+5:302018-07-21T23:58:58+5:30
कोणत्या भागाला नेमका कसा फायदा होईल, याबाबत संभ्रम असल्याने त्यावरच आता चर्चा सुरू आहे.
ठाणे : जुन्या ठाण्याच्या पुनर्विकासाच्या मार्गातील अडथळे आता एकेक करून दूर होऊ लागले असून आता ३० वर्षे जुन्या इमारतींना प्रोत्साहनपर जादा चटईक्षेत्र देण्याचा निर्णय नगरविकास खात्याने घेतल्यानंतर आता मागील कित्येक वर्षांची दोन एफएसआयची मागणीदेखील मार्गी लागली आहे. परंतु, जुन्या ठाण्यात दाटीवाटीचे क्षेत्र आणि रेसिडेन्शिअल झोन असे भाग आहेत. शिवाय, यातील काही भाग गावठाणांमध्येही जात आहे. त्यामुळे येथील कोणत्या भागाला नेमका कसा फायदा होईल, याबाबत संभ्रम असल्याने त्यावरच आता चर्चा सुरू आहे.
जुन्या ठाण्यातील इमारतींच्या पुनर्विकासासाठी टीडीआर मिळावा, यासाठी शिवसेना, भाजपामध्ये रस्सीखेच सुरू होती. एकीकडे क्लस्टर मंजूर झाले असताना जुन्या ठाण्यावर मात्र पुनर्विकासाची टांगती तलवार कायम आहे.
शहरातील म्हणजेच ठाणे पूर्व ते माजिवडा सेक्टर १ ते ३ हे भाग जुने ठाणे म्हणून ओळखले जातात. या भागातील बहुतांश इमारती अधिकृत तसेच ग्रामपंचायत आणि नगरपालिका काळातील असल्याने पुनर्विकासाचा मार्ग खडतर झाला आहे. यासाठी शिवसेना आणि भाजपाचा शासनाकडे पत्रव्यवहार सुरू होता.
गावठाणांचे काय?
आता मात्र शासनाने दोन एफएसआय मंजूर केल्याने याचा लाभ रेसिडेन्शिअल झोनलाच अधिक होणार आहे. यापूर्वी रेसिडेन्शिअल झोनसाठी प्रोत्साहनपर चटईक्षेत्र पकडून १.६५ एफएसआय मिळत होता. आता दोन एफएसआयमुळे विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.
परंतु, या भागात चरई, सुभाष पथाचा काही भाग यासह इतर काही परिसर गावठाणांमध्ये मोडत आहे. त्यामुळे हा भागही यातून वगळला जाणार आहे. एकूणच या वाढीव एफएसआयचा नेमका कोणत्या भागाला कसा फायदा होईल, हे सर्व्हेनंतरच स्पष्ट होणार आहे.
तीनऐवजी दोन चटईक्षेत्रावर बोळवण
मागील महिन्यात अधिसूचना जारी करून पूर्वीच्या २० वर्षांचा असणारा कालावधी बदलून ३० वर्षांपूर्वीच्या इमारतींना ०.१५ किंवा ०.५ इमारतींना प्रोत्साहनपर जादा चटईक्षेत्र मंजूर केले. परंतु, ३० वर्षांपूर्वीच्या धोकादायक इमारतींना दोन चटईक्षेत्र द्यावे, यासाठी प्रयत्न सुरू होते.
अखेर, शुक्रवारी नागपूर अधिवेशनात शासनाने जुन्या ठाण्याला दोन एफएसआय देण्याची घोषणा केली. परंतु, जुने ठाणे हे ठाणे
पूर्व ते माजिवडा सेक्टर १ ते ३ अशा भागांत विभागले आहे. त्यातही दाटीवाटीचे क्षेत्र आणि रेसिडेन्शिअल झोन असे दोन भाग येथे आहेत. दाटीवाटीच्या क्षेत्रासाठी दोन एफएसआय मिळत आहे. परंतु, येथे तीन एफएसआय मिळावा, अशी मागणी आहे.