नव्या वेळापत्रकातही गोंधळ कायम; महिलांच्या राखीव डब्यांमुळे पुरूष प्रवाशांची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 05:33 AM2017-11-02T05:33:18+5:302017-11-02T05:33:21+5:30
मध्य रेल्वेच्या नवीन वेळापत्रकावर बदलापूर व टिटवाळ्यातील रेल्वे प्रवासी आनंदी आहेत, तर कल्याण-डोंबिवलीतील प्रवाशांना मात्र हे वेळापत्रक रुचलेले नाही. बदलापूरमध्ये बुधवारी स्थानकाचा वाढदिवस साजरा झाला.
डोंबिवली : मध्य रेल्वेच्या नवीन वेळापत्रकावर बदलापूर व टिटवाळ्यातील रेल्वे प्रवासी आनंदी आहेत, तर कल्याण-डोंबिवलीतील प्रवाशांना मात्र हे वेळापत्रक रुचलेले नाही. बदलापूरमध्ये बुधवारी स्थानकाचा वाढदिवस साजरा झाला. तसेच नवीन गाडीचे स्वागत करण्यात आले. त्याच वेळी कल्याण-डोंबिवलीतील प्रवासी आपली नाराजी उघडपणे व्यक्त करत होते.
मध्य रेल्वेच्या प्रवाशांना नवीन १८ गाड्यांची भेट मिळाली आहे. त्यात काही लोकलच्या फेºयांचा विस्तार, तर काही लोकलमध्ये महिलांसाठी तीन अतिरिक्त डबे देण्यात आले. मात्र, लोकलच्या वेळांमध्ये बदल झाल्याने बुधवारी त्याचा फटका प्रवाशांना बसला. महिलांच्या जादा डब्यांमुळे पुरुष प्रवाशांची धावपळ उडाली. तर, काही लोकल रद्द झाल्याने अनेकांची गैरसोय झाली. बदलापूरमध्ये नवीन बदलापूर-दादर लोकलचे स्वागत केले. गार्ड, मोटरमन यांना संजय मेस्त्री यांनी पुष्पगुच्छ दिला. सकाळच्या दादर लोकलमध्ये महिलांसाठी तीन जादा डबे राखीव झाले आहेत. त्यात बुधवारी सवयीप्रमाणे पुरुष चढल्याने महिलांमध्ये गोंधळ होता. कल्याणच्या अनुष्का केळकर यांनीही सकाळी ८.३४ वाजता फलाट-५ वर येणारी लोकल अचानक सहावर आल्याने गोंधळ झाल्याचे सांगितले. रात्रीच्या शेवटच्या लोकलची वेळ १० मिनिटे अलीकडे आणल्याने प्रवाशांनी रेल्वेवर टीका केली.
टिटवाळ्यातील
प्रवाशांना दिलासा
टिटवाळ्यातील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. सकाळी ८.१० वाजताच्या टिटवाळा-दादर लोकलच्या कसारा दिशेकडील तीन डबे महिलांसाठी राखीव ठेवले आहेत. त्याचबरोबर सायंकाळी ५.०५ वाजता टिटवाळा-सीएसएमटीकरिता नवीन धीमी लोकल सुरू झाली आहे.
टिटवाळ्यातील प्रवाशांना मध्य रेल्वेकडून वाढीव फेºयांसह विविध सेवासुविधा मिळाव्यात, यासाठी रेल्वे पॅसेंजर जनहित संघर्ष मंचाने वेळोवेळी मध्य रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. दरम्यान, तीन जादा डबे मिळाल्याने बुधवारी सकाळी महिला व मंचाच्या सदस्यांनी टिटवाळा स्थानकात जल्लोष केला.