ठाण्याच्या महासभेत गोंधळ : सहा महिन्यांपासून पाणीबाणी असल्याची कबुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 02:56 AM2017-10-14T02:56:31+5:302017-10-14T02:56:43+5:30
घोडबंदर रोड भागातील नव्या बांधकामांवर उच्च न्यायालयाने लागू केलेली बांधकामबंदी उठवण्याकरिता या भागात पुरेसा पाणीपुरवठा होत असल्याचा दावा करणाºया ठाणे महापालिका प्रशासनाचे पितळ शुक्रवारी महासभेत उघडे पडले.
ठाणे : घोडबंदर रोड भागातील नव्या बांधकामांवर उच्च न्यायालयाने लागू केलेली बांधकामबंदी उठवण्याकरिता या भागात पुरेसा पाणीपुरवठा होत असल्याचा दावा करणाºया ठाणे महापालिका प्रशासनाचे पितळ शुक्रवारी महासभेत उघडे पडले. घोडबंदरच नव्हे तर संपूर्ण ठाणे शहरात पाणीवितरणातील अनियमिततेमुळे गेल्या सहा महिन्यांपासून पाणीटंचाई जाणवत असल्याची कबुली पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी रवींद्र खडताळे यांनी दिली.
घोडबंदर भागातील वाढत्या बांधकामांवर पाणीपुरवठ्याच्या मुद्यावरून उच्च न्यायालयाने बंदी लागू केली आणि ठाणे पालिकेवर ताशेरे ओढले. परंतु, घोडबंदरसह संपूर्ण ठाणे शहराला २०४० पर्यंत सुरळीत पाणीपुरवठा करण्याचे नियोजन असल्याचे आणि सध्याचा पाणीपुरवठा पुरेसा असल्याचे प्रतिज्ञापत्र पालिकेने सादर केल्यानंतर दोन दिवसांपूर्वी न्यायालयाने घोडबंदरची बांधकामबंदी उठवली.
शुक्रवारच्या महासभेत पालिकेचा दावा अक्षरश: फोल ठरला. राष्टÑवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी वागळे पट्ट्यासह लोकमान्यनगर भागात मागील सहा महिन्यांपासून पाण्यासाठी लोकांची वणवण सुरू असल्याचे सांगितले. ही समस्या सुटावी, म्हणून वारंवार पत्रव्यवहारही करण्यात आला. परंतु, आजही या भागाची पाण्याची समस्या का सुटली नाही, असा सवाल उपस्थित केला. नजीब मुल्ला म्हणाले की, शहराला आजघडीला ४८० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत असल्याचे सांगितले जाते. लोकसंख्या व प्रतिमाणशी पाणी देण्याचे मापदंड यांचा विचार करता उपलब्ध पाणी तब्बल २२ टक्के अधिक आहे. असे असतानाही ठाण्याला पाण्यासाठी वणवण का करावी लागते, असा सवाल त्यांनी केला. अनेक नगरसेवकांनी आपापल्या भागातील पाणीपुरवठा अनियमित असून पूर्वी एक तास येणारे पाणी आता अवघे १० मिनिटेच येत असल्याचे निदर्शनास आणले. मुंब्रा येथे पाण्याची समस्या तीव्र असल्याची बाब नगरसेवक शानू पठाण यांनी निदर्शनास आणली. अशोक वैती यांनी त्यांच्या परिसरातील नागरिक तब्बल ४२ वर्षे शुद्ध न केलेले (रॉ वॉटर) पाणी पित असल्याचा गौप्यस्फोट केला. यावर उपाययोजना केल्या जात असल्याचे बोलले जाते. परंतु, अद्यापही योग्य ती कार्यवाही का झाली नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. भरत चव्हाण, अनिता गौरी, मालती पाटील, संजय भोईर, शैलेश पाटील आदी नगरसेवकांनी पालिका प्रशासनाला पाण्याच्या मुद्यावरून चांगलेच धारेवर धरले.