मराठीप्रेमी पालकांचे मुंबईत भरणार महासंमेलन! मातृभाषेतून शिकण्यासाठी महाजनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 05:22 AM2017-11-30T05:22:42+5:302017-11-30T05:23:02+5:30
शालेय शिक्षणात इंग्रजी माध्यमाचे प्रस्थ दिवसेंदिवस वाढत असतानाच काही स्वयंसेवी संस्था मराठी शाळा जगवण्याचा, टिकवण्याचा आणि वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. ठाण्यातील मराठी अभ्यास केंद्रही गेल्या १५ वर्षांपासून ‘मातृभाषेतून शिकण्यासाठी मराठी टिकवण्यासाठी’ जनजागृती करते आहे.
- महेंद्र सुके
ठाणे : शालेय शिक्षणात इंग्रजी माध्यमाचे प्रस्थ दिवसेंदिवस वाढत असतानाच काही स्वयंसेवी संस्था मराठी शाळा जगवण्याचा, टिकवण्याचा आणि वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. ठाण्यातील मराठी अभ्यास केंद्रही गेल्या १५ वर्षांपासून ‘मातृभाषेतून शिकण्यासाठी मराठी टिकवण्यासाठी’ जनजागृती करते आहे. याच जनजागृतीला व्यापक स्वरूप देऊन येत्या २४ आणि २५ डिसेंबरला मुंबईत ‘मराठीप्रेमी पालकांचे महासंमेलन’ पहिल्यांदाच भरवले जात आहे.
मातृभाषा शिक्षणाचे महत्त्व जगभर निर्विवाद सिद्ध झालेले आहे. महाराष्ट्रातील मराठी शाळांचे
संवर्धन, पालकांच्या मनातील समज-गैरसमज, शासनाची धोरणं, शिक्षकांची तळमळ आणि कोंडी, पालकांची संभ्रमावस्था, मुलांवरचा ताण, इंग्रजी भाषा व इंग्रजी माध्यम अशा अनेक विषयांना धरून या संमेलनात जनजागृतीची मोट बांधली जाणार आहे. मराठी शाळा या मराठी भाषेचा कणा आहेत आणि मराठी शाळा टिकल्या तरच मराठी भाषा जगेल, त्यासाठी आयोजकांनी हे संमेलन भरवण्याचे ठरवले आहे.
या संमेलनात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार ते पालघर, डहाणू इथल्या शाळांचे मिळून जवळपास २० हजार पालक व इतर नागरिक उपस्थित राहतील, असा अंदाज आहे.
महाराष्ट्राच्या विविध भागांत प्रयोगशील शिक्षणासाठी काम करणारे मान्यवर, अभ्यासक, राजकीय नेते, साहित्य-सिने-नाट्य-क्षेत्रातील दिग्गजांची व्याख्याने आणि चर्चासत्रांच्या माध्यमातून या
संमेलनात मातृभाषेतूनच शिक्षण घेण्याची गरज पटवून देणार आहेत. महाराष्ट्राच्या विविध भागांतील प्रयोगशील शाळा, शालोपयोगी वस्तू विक्री करणाºया कंपन्या, प्रकाशकांची ग्रंथप्रकाशने, मराठी भाषेसाठी
काम करणाºया विविध संस्था/ संघटनांची माहिती देणारी दालने असे अनेक स्टॉल्स या महासंमेलनात असणार आहेत.
या संमेलनात महाराष्ट्राच्या विविध भागांतील शाळांत शिक्षणविषयक जे प्रवाह, पद्धती राबवल्या जात आहेत, त्यांवर आधारित ‘मराठी शाळा विशेषांक’ही प्रकाशित करण्यात येणार आहे. मराठी शाळांमधून शिक्षण घेऊन आज वेगवेगळ्या क्षेत्रांत नामवंत झालेल्या व्यक्तींचे अनुभवकथन पालक आणि नागरिकांना मातृभाषेतून शिक्षण घेण्याची प्रेरणा देतील, असा विश्वास आयोजकांना आहे.
जनजागृतीसाठी फेसबुक पेजचा आधार
‘मराठी अभ्यास केंद्र’ नावाने एक फेसबुक पेज तयार करण्यात आले असून या महासंमेलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मराठी अभ्यास केंद्र मराठीप्रेमी सर्वसामान्य नागरिकांनी एकत्र येऊन उभी केलेली संस्था असून आपल्या मातृभाषेच्या संवर्धनासाठी ती काम करते आहे. या महासंमेलनाचे स्थळ लवकरच निश्चित होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. प्रा.डॉ. वीणा सानेकर आणि आनंद भंडारे या उपक्रमाचे प्रकल्प समन्वयक आहेत.