इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे केंद्र सरकारविरोधात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:49 AM2021-06-09T04:49:31+5:302021-06-09T04:49:31+5:30
ठाणे : आधीच कोरोना निर्बंधांमुळे बेजार झालेली सर्वसामान्य जनता शंभरी पार केलेल्या पेट्रोल-डिझेल दरवाढीने हैराण झाली असून, केंद्र सरकारने ...
ठाणे : आधीच कोरोना निर्बंधांमुळे बेजार झालेली सर्वसामान्य जनता शंभरी पार केलेल्या पेट्रोल-डिझेल दरवाढीने हैराण झाली असून, केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील लावलेला कर कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी सोमवारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष व माजी मंत्री नसीम खान यांनी केली.
ठाण्यात तीन पेट्रोलपंपांवर सोमवारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. शहरातील तत्त्वज्ञान विद्यापीठ येथील पेट्रोलपंपाजवळ तसेच विटावा येथील पेट्रोलपंपाजवळही काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरवाढीच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रात सोमवारी सकाळी ११ वाजता राज्यातील विविध पेट्रोलपंपांजवळ निदर्शने केली. त्याअंतर्गत ठाण्यात खान याच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी ठाणे काँग्रेस अध्यक्ष ॲड. विक्रांत चव्हाण, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मनोज शिंदे, तारीक फारुकी, जिल्हा इंटक काॅंग्रेस अध्यक्ष सचिन शिंदे, प्रदेश सदस्य सुखदेव घोलप, राजेश जाधव, प्रदीप राव, मोहन तिवारी, महेंद्र म्हात्रे, मिलिंद खराडे, झिया शेख, संदीप शिंदे, रवींद्र कोळी, प्रसाद पाटील, राहुल पिंगळे, मंजूर खत्री, महिला अध्यक्ष शिल्पा सोनोने, रेखा मिरजकर, निर्मला जोशी, विनय विचारे, मनोज पांडे, गिरीश कोळी आदी पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना खान यांनी सांगितले की, २०१४ मध्ये काँग्रेसचे सरकार असताना क्रूड ऑइलचा जागतिक दर १०४ रुपये होता तरीही त्यावेळेस तत्कालीन सरकारने पेट्रोल, डिझेलचे दर ८० रुपये ठेवून सर्वसामान्य जनतेला दिलासा दिला होता. आता तर क्रूड ऑइलचे जागतिक दर ६३ रुपये एवढे खाली आले तरीही भाजप शासित केंद्र सरकारने हा दर १०४वर आणला आहे. याकरिता सरकारने जो टॅक्स लावला आहे तो कमी केला तर निश्चितच पेट्रोल-डिझेलचे भाव कमी होतील; परंतु हे सरकार गरिबांचे, सर्वसामान्य जनतेच नसून काही मूठभर श्रीमंतांचे आहे हे आता दिसत आहे.