वाढत्या महागाईविरोधात ठाण्यात काँग्रेसचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:52 AM2021-02-20T05:52:33+5:302021-02-20T05:52:33+5:30
ठाणे : दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ होत आहे. अशातच पेट्रोलचे दर १०० रुपयांच्या आसपास पोहोचले आहेत. ही ...
ठाणे : दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ होत आहे. अशातच पेट्रोलचे दर १०० रुपयांच्या आसपास पोहोचले आहेत. ही महागाई व केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी ठाणे महिला कॉंग्रेसने मोर्चाचे आयोजन केले होते. हा मोर्चा ठाणे कॉंग्रेस कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय असा काढण्यात आला. यावेळी महिला काँग्रेसच्या अध्यक्ष संध्या सव्वालाखे यांच्यासह कार्याध्यक्षा प्रणिती शिंदे, ठाणे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण, ठाणे कॉंग्रेसच्या महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
देशात शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. मात्र, त्याकडे लक्ष देण्यासाठी केंद्र सरकारला वेळ नाही. भाजप सरकार हे महिलांच्या विरोधातील सरकार आहे. दिवसेंदिवस महागाईने कळस गाठला आहे. राज्यासह देशभरात तेलाच्या किमती वाढत आहेत. जोपर्यंत मोदी हटाव होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रातील महिला कॉंग्रेस निषेध नोंदविणार असल्याची माहिती सव्वालाखे यांनी दिली.
चौकट -
एकीकडे राज्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे पुन्हा टाळेबंदी करण्याची वेळ ओढवते का? या विवंचनेत आहे. तसेच सरकारकडून मास्क परिधान करण्याबरोबरच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याबाबत सूचना देण्यात येत आहे. असे असताना, गुरुवारी ठाणे महिला कॉंग्रेसने काढलेल्या मोर्चात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे दिसले.
बोलणाऱ्यांविरोधात गळचेपीचे मोदी सरकारचे धोरण
नरेंद्र मोदी सरकार वेगवेगळ्या दबाव यंत्रणा वापरत आहे हे जगजाहीर आहे. सरकारच्या विरोधात कोण काही बोलले तर त्यांची गळचेपी करण्याचे काम हे सरकार करीत असल्याचे कॉंग्रेस कार्याध्यक्षा प्रणिती शिंदे यांनी यावेळी सांगितले. तसेच कोरोनाचे रुग्ण वाढत आहे, त्यामुळे सर्वांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. मात्र, तुम्हीच मास्क परिधान केला नसल्याचे विचारले असता, मला कोरोना होऊन गेला असून, माझ्या ॲण्टिबॉडिज वाढल्याचे सांगून त्यांनी अधिक बोलणे टाळले.