मीरा भाईंदर महापालिकेत रुग्णालय व मलनिस्सारण केंद्रां प्रकरणी काँग्रेसचा हल्लाबोल मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 07:18 PM2022-08-01T19:18:26+5:302022-08-01T19:18:58+5:30
मीरा भाईंदर महापालिकेत भूमिगत गटार योजना व मलनिस्सरण केंद्रातील गैरप्रकार तसेच रुग्णालयात वैद्यकीय सुविधा नसताना बांधकामावर करोडोंचा खर्च
मीरारोड -
मीरा भाईंदर महापालिकेत भूमिगत गटार योजना व मलनिस्सरण केंद्रातील गैरप्रकार तसेच रुग्णालयात वैद्यकीय सुविधा नसताना बांधकामावर करोडोंचा खर्च प्रकरणी काँग्रेसच्या वतीने महापालिकेत अचानक घोषणाबाजी करत महापालिका व सत्ताधारी विरुद्ध हल्लाबोल मोर्चाकाढण्यात आला.
महापालिका मुख्यालयात सोमवारी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक अनिल सावंत व अशरफ शेख, नगरसेविका रुबीना फिरोज व गीता परदेशी सह युवक काँग्रेसचे दीप काकडे, सिद्धेश राणे, कुणाल काटकर, मुकुल त्यागी आदींसह कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. मुख्यालयात आयुक्तांसह अनेक अधिकारी दालनात जाऊन घोषणा दिल्या.
भूमिगत गटार योजनेसाठी ५०० कोटींचा खर्च करून सुद्धा अजून योजना पूर्ण झालेली नाही. नागरिकांकडून वर्षाला सुमारे ५ कोटींचा कर वसूल केला जात आहे. त्यातच मलनिस्सारण केंद्र पूर्ण क्षमेतेने चालत नसताना महापालिका महिन्याला त्यासाठी ७२ लाखांचा खर्च करत आहे. काही केंद्र तर बंद आहेत. प्रत्यक्षात सांडपाणी प्रक्रिया न करताच खाडीत सोडले जात असून पर्यावरणाचा व जनतेच्या पैश्यांचा चुराडा महापालिका व सत्ताधारी भाजपाने चालवल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष सामंत यांनी यावेळी केला.
मीरारोड मधील काँग्रेस काळात बांधलेले गेलेल्या भारतरत्न इंदिरा गांधी पालिका रुग्णालयात गरजू रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. आवश्यक तपासणी यंत्र व सोयी सुविधा देण्यास पैसा नाही परंतु वाढीव बांधकामावर तब्बल ११ कोटींची उधळपट्टी पालिका व सत्ताधारी यांनी चालवल्याचे सामंत म्हणाले.
शिष्टमंडळाने या दोन्ही विषयांवर शहर अभियंता दीपक खांबित व अतिरिक्त आयुक्त डॉ . संभाजी पानपट्टे यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली.