देशाला अडचणीत आणण्याचे काँग्रेसचे प्रयत्न- सुधांशू त्रिवेदी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 04:32 AM2020-01-11T04:32:46+5:302020-01-11T04:32:54+5:30
नागरिकता सुधारणा कायदा हा मूळ काँग्रेसने आणलेला आहे.
ठाणे : नागरिकता सुधारणा कायदा हा मूळ काँग्रेसने आणलेला आहे. काँग्रेसच्या माजी पंतप्रधानांनी, माजी मुख्यमंत्र्यांनी आणि काँग्रेस समितीने आग्रह धरलेल्या या कायद्याला मोदी सरकार प्रत्यक्षात उतरवत असतानादेखील केवळ सत्तेपासून वंचित असलेल्या काँग्रेसला राजकारण करून देशाला अडचणीत आणायचे आहे, हे स्पष्ट दिसत असल्याची टीका भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते खा. सुधांशू त्रिवेदी यांनी गुरुवारी केली. रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प गुंफताना ते बोलत होते.
नागरिकता सुधारणा कायद्यावर मत मांडताना सुधांशू त्रिवेदी पुढे म्हणाले की, धर्माच्या नावावर जो देश जन्माला आला, त्याचे धर्मबांधवांनीच दोन तुकडे केले. मात्र, भारत असा देश आहे, त्यात सर्वधर्मीय एकत्र नांदले, वाढले व त्यांचा विकास झाला. मात्र, काँग्रेसने मतांच्या राजकारणासाठी सतत कट्टरपंथीय धर्मभावनेला खतपाणी घातले. स्वातंत्र्यपूर्व काळात शिक्षणाचे सर्वाधिक प्रमाण असलेल्या मुस्लिम समाजाला काँग्रेसने सतत भीतीच्या सावटाखाली ठेवले. त्यांना मदरशात टाकले. स्वतंत्र कायदा करून त्यांना देशात मिसळू दिले नाही. फतव्यात अडकवले. मुस्लिमांमधील कलाम, बिस्मिल्ला खान, ब्रिगेडिअर उस्मान यांना हीरो करू दिले नाही, तर मुस्लिम समाजाला अफजल गुरू, याकुब मेमन आणि बुरहान वाणीच्या कट्टरतेकडे काँग्रेसने वळवले. मतांसाठी देश तोडत राहिले आणि आता संपूर्ण देशात तोडफोड करीत आहेत. देशात कोण शरणार्थी आणि कोण घुसखोर आहेत, हे मोदी सरकारला चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रनीती म्हणून नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी होणारच, असा विश्वास त्रिवेदी यांनी व्यक्त केला.
ज्यांना कालपर्यंत परराज्यांतील भारतीयदेखील नको होते, ते सत्तेच्या मोहापायी घुसखोरांची तळी उचलत आहेत, असे बोलत त्रिवेदी यांनी शिवसेनेवर टीका केली. एनआरसी अद्याप आला नसला तरी, जणू तो देवकीचा आठवा मुलगा आहे आणि आता तो कंसाचा वध करेल, असे म्हणून काही लोक ऊर बडवत असल्याचा टोला त्रिवेदी यांनी लगावला.
हा कायदा देशाला नवीन आयाम देणारा ठरेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे होते. यावेळी म्हाळगी व्याख्यानमालेचे अध्यक्ष आमदार संजय केळकर आणि सचिव शरद पुरोहित व्यासपीठावर उपस्थित होते.
>शेरोशायरीही पाकिस्तानी
अब्दुल कलाम, बिस्मिल्ला खान, ब्रिगेडिअर उस्मान यांचा सर्वधर्मसमभाव काँग्रेसला नकोय. त्यांना याकुब मेमन, अफजल गुरू आणि बुरहान वाणीचा सर्वधर्मसमभाव हवा आहे. धार्मिक कट्टरपंथींच्या विचाराला बळ देऊन आधी देश तोडणाऱ्या आणि आता देशात तोडफोड करणाºया काँग्रेसची शेरोशायरीदेखील आता पाकिस्तानी झाली असल्याची टीका सुधांशू त्रिवेदी यांनी या वेळी केली.