काँग्रेसची शेरोशायरी देखील पाकीस्थानी – सुधांशु त्रिवेदी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 10:32 PM2020-01-09T22:32:05+5:302020-01-09T22:53:11+5:30
धर्माच्या नावावर जो देश जन्माला आला त्याचे धर्म बांधवांनीच दोन तुकडे केले मात्र भारत असा देश आहे.
ठाणे:अब्दुल कलाम, बिस्मिल्ला खान, ब्रिगेडीअर उस्मान, रसखान यांचा सर्वधर्मसमभाव काँग्रेसला नकोय त्यांना याकुब मेमन, अफजल गुरु आणि बुरहान वाणीचा सर्वधर्मसमभाव हवा आहे. धार्मिक कट्टरपंथ्थीच्या विचाराला बळ देऊन पहिले देश तोडणारी व आता देशात तोडफोड करणारी काँग्रेसची शेरोशायरी देखील आता पाकीस्थानी झाली असल्याची टिका भाजपा राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी येथे केली. रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प गुंफतांना ते बोलत होते.
धर्माच्या नावावर जो देश जन्माला आला त्याचे धर्म बांधवांनीच दोन तुकडे केले मात्र भारत असा देश आहे त्यात सर्वधर्मीय एकत्र नांदले, वाढले व त्यांचा विकास झाला. मात्र कॉंग्रेसने मतांच्या राजकारणासाठी सतत कट्टरपंथीय धर्मभावनेला खतपाणी घातले. स्वातंत्र्यपुर्व काळात शिक्षणाचे सर्वाधिक प्रमाण असलेला मुस्लीम समाजाला कॉंग्रेसने सतत भीतीच्या सावटाखाली ठेवले. त्यांना मदरस्यात टाकले, स्वतंत्र कायदा करून त्यांना देशात मिसळू दिले नाही, फतव्यात अडकवले. मुस्लीमांमधील कलाम, बिस्मिला खान, ब्रिगेडीअर उस्मान यांना हिरो करू दिले नाही तर मुस्लीम समाजाला अफजल गुरू, याकुब मेमन आणि बुरहान वाणीच्या कट्टरतेकडे काँग्रेसने वळवले.
मतांसाठी असे देश तोडत राहिले आणि आता संपुर्ण देशात तोडफोड करीत आहेत. नागरिकता कायदा हा मुळ काँग्रेसने आणलेला, काँग्रेसच्या माजी पंतप्रधानांनी, माजी मुख्यमंत्र्यांनी आणि ग्रेस समितीने आग्रह धरलेल्या या कायदयाला मोदी सरकार प्रत्यक्षात उतरवत असतांना देखील केवळ सत्तेपासुन वंचित काँग्रेसला राजकारण करून देशाला अडचणीत आणायचे आहे हे स्पष्ट दिसत असल्याची टिका भाजपा राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी केली.
देशात कोण शरणार्थी आणि कोण खुसखोर आहेत हे मोदी सरकारला चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रनिती म्हणून सीएएची अंमलबजावणी होणार असा विश्वास त्रिवेदी यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला. ज्यांना कालपर्यंत परराज्यातील भारतीय देखील नको होते ते सत्तेच्या मोहापायी परराष्ट्रातील घुसखोरांची तळी उचलत आहेत असे बोलत त्रिवेदी यांनी शिवसेनेवर टिका केली. एनआरसी अजुन आला नसला तरी जणू तो देवकीचा आठवा मुलगा आहे आणि आता तो कंसाचा वध करेल असे म्हणून काही लोक उर बडवत आहेत असाही टोला त्रिवेदी यांनी आपल्या भाषणात लगावला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुध्दे होते. यावेळी म्हाळगी व्याख्यानमालेचे अध्यक्ष आमदार संजय केळकर व सचिव शरद पुरोहित व्यासपीठावर उपस्थित होते.