‘दत्तां’च्या मनमानीने कल्याणात काँग्रेस ‘दिगंबर’

By admin | Published: August 9, 2015 11:18 PM2015-08-09T23:18:35+5:302015-08-09T23:18:35+5:30

काँग्रेसचे आमदार संजय दत्त यांच्या मनमानी कारभारामुळे येथील काँग्रेसवर ‘दिगंबर’ होण्याची पाळी ओढावली आहे. त्यामुळेच डीएमसीतील सत्ताधारी असलेल्या शिवसेना-भाजपामध्ये

Congress 'Digambar' in Dada's arbitrariness | ‘दत्तां’च्या मनमानीने कल्याणात काँग्रेस ‘दिगंबर’

‘दत्तां’च्या मनमानीने कल्याणात काँग्रेस ‘दिगंबर’

Next

कल्याण : काँग्रेसचे आमदार संजय दत्त यांच्या मनमानी कारभारामुळे येथील काँग्रेसवर ‘दिगंबर’ होण्याची पाळी ओढावली आहे. त्यामुळेच डीएमसीतील सत्ताधारी असलेल्या शिवसेना-भाजपामध्ये कॉग्रेसमध्ये नगरसेवक धाव घेत आहेत. अपक्ष आमदार गणपत गायकवाड यांच्यासह काही राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना पक्षात आणण्यात भाजपाला यश आले असताना दुसरीकडे शिवसेनेनेही अन्य पक्षांतील नगरसेवकांना पक्षात आणण्याचा सपाटा लावला आहे. अपक्षांसह राष्ट्रवादीतील काही नगरसेवकांना प्रवेश दिला असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक तथा महापालिकेचे विरोधी पक्षनेते विश्वनाथ राणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक संजय पाटील यांनादेखील पक्षात घेऊन शिवसेनेने विरोधी पक्षाबरोबरच मित्रपक्ष भाजपालाही शह दिल्याची चर्चा आहे. रविवारी मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.
पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असलेले राणे हे नारायण राणे समर्थक असून सन २००५ मध्ये त्यांच्याबरोबर विश्वनाथ राणे यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. अभ्यासू नगरसेवक म्हणून ओळख असलेल्या राणे यांना काँग्रेस पक्षाने स्वीकृतपदाबरोबरच गटनेतेपद बहाल केले होते. तर सध्या ते महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपद भूषवित आहेत. दरम्यान पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळल्याने पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचे राणे यांचे म्हणणे आहे. विधानसभा निवडणुकीत इच्छुक होतो, परंतु पक्षाने उमेदवारी दिली नाही, तरीदेखील आपण इमाने इतबारे पक्षाचे उमेदवार सचिन पोटे यांचे काम केले. तर दुसरीकडे प्रकाश मुथा यांनी बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. तरी त्यांना आता पुन्हा पक्षात स्थान देण्यात आले. ज्या पक्षात बंडखोरांना आश्रय दिला जातो त्यात न राहिलेलेच बरे, अशी प्रतिक्रिया राणे यांनी लोकमतशी बोलताना दिली. दुसरीकडे राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संजय पाटील यांनीदेखील राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. पाटील हे आमदार किसन कथोरे यांचे समर्थक मानले जातात. त्यामुळे ते भाजपात जातील, अशी चर्चा होती. परंतु, त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून आश्चर्याचा धकका दिला आहे. राष्ट्रवादीच्या काही आजी-माजी नगरसेवकांनी आमदार गायकवाड यांच्यासह भाजपाची वाट धरली, तर राष्ट्रवादीचे निलेश शिंदे, माधुरी काळे आणि प्रशांत काळे आदींनीही नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे.
एकंदरीतच चित्र पाहता राष्ट्रवादीचे बहुतांश नगरसेवक अन्य पक्षांच्या गळाला लागल्याचे चित्र असताना शिवसेनेने काँग्रेसलादेखील राणेंच्या प्रवेशाने एकच दणका दिल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Congress 'Digambar' in Dada's arbitrariness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.