मुस्लीम धर्मगुरूंमुळे काँग्रेसला लाभ
By Admin | Published: May 31, 2017 05:58 AM2017-05-31T05:58:22+5:302017-05-31T05:58:22+5:30
महापालिका निवडणुकीत मताचा टक्का वाढावा याकरिता महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी यांनी
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : महापालिका निवडणुकीत मताचा टक्का वाढावा याकरिता महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी यांनी बोलावलेल्या बैठकीत केवळ मुस्लीम धर्मगुरुंनाच बोलावल्याने जास्त मुस्लीम नगरसेवक निवडून आले व काँग्रेसला भरघोस यश लाभले, असा आरोप रिद्वान बुबेरे यांनी केला आहे.
बुबेरे यांनी याच मुद्द्यावर राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहून आपली नापसंती व्यक्त केली होती व निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र आयोगाने त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नव्हती. आता याच मुद्द्याच्या आधारे न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती बुबेरे यांचे वकील आप्पा फडके यांनी दिली.
निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा याकरिता दि. १९ मे रोजी महानगरपालिकेने काढलेल्या आदेशानुसार आयुक्तांनी २०मे रोजी सायंकाळी ४ वाजता बैठकीचे आयोजन केले होते. त्याकरिता सेवाभावी संस्था, डॉक्टर, वकील, बचत गट,राजकीय पक्ष, विविध असोसिएशन, रोटरी क्लब, लायन्स क्लब अशा विविध समाजसेवी संस्थांबरोबर मुस्लीम समाजातील धर्मगुरू यांना आमंत्रित केले होते. इतर समाजातील धर्मगुरूंना या बैठकीला न बोलावल्याने निवडणुकीवर एकाच समाजाचा प्रभाव पडला, असे माजी नगराध्यक्ष रिद्वान बुबेरे व रजा अब्दुल समद फक्कीह यांचे म्हणणे आहे. ही बैठक झाल्यावर लागलीच २३ मे रोजी उभयतांनी राज्य निवडणूक आयोगाकडे निवडणूक अधिकारी योगेश म्हसे यांच्या विरुद्ध लेखी तक्रार नोंदवली होती. निवडणूक यंत्रणेने निष्पक्ष असले पाहिजे. भिवंडीत मुस्लीमांची संख्या लक्षणीय असली तरी अन्य धर्मीयांचे वास्तव्य असल्याने एकतर सर्व धर्माच्या गुरुंना बैठकीला बोलवायला हवे होते किंवा कुणालाही बोलवायला नको होते, असे त्यांचे मत आहे. परंतु आयोगाने या तक्रारीची दखल न घेतल्याने निवडणुकीत तब्बल ४३ मुस्लीम नगरसेवक निवडून आले व काँग्रेसला त्याचा लाभ झाला, असे त्यांचे म्हणणे आहे.