भिवंडीत मतदारांचा काँग्रेसला हात
By admin | Published: May 27, 2017 02:18 AM2017-05-27T02:18:31+5:302017-05-27T02:18:31+5:30
मागील निवडणुकीतील २६ जागांवरून थेट ४७ जागांवर मजल मारत भिवंडीत काँग्रेस पक्षाने एकहाती सत्ता मिळवली आणि भाजपा, शिवसेनेसह, धर्मनिरपेक्ष आघाडीच्या माध्यमातून
पंकज रोडेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : मागील निवडणुकीतील २६ जागांवरून थेट ४७ जागांवर मजल मारत भिवंडीत काँग्रेस पक्षाने एकहाती सत्ता मिळवली आणि भाजपा, शिवसेनेसह, धर्मनिरपेक्ष आघाडीच्या माध्यमातून कोंडी करणाऱ्या समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसलाही धोबीपछाड दिला. शिवाय कोणार्क आघाडीचे संधीसाधू राजकारणही धुळीस मिळवले.
पालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय काँग्रेसने घेतल्यानंतर त्याबद्दल समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादीने नाराजी व्यक्त केली होती. स्वत:ची वेगळी आघाडी स्थापन केली होती. स्वत:च्या ताकदीबद्दल असलेल्या भ्रमातून काँग्रेस पक्ष बाहेर पडण्यास तयार नसल्याचे टीकास्त्र त्यांनी सोडले होते. पण आजवर नेहमीच भिवंडीतील मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढविण्यासाठी इतर पक्षातील उमेदवार तयार होते आणि अल्पसंख्य समाजात विश्वास निर्माण करण्यात भाजपा, समाजवादी पक्ष अपयशी ठरल्याने, एमआयएममध्ये ती ताकद नसल्याने आपणच ही पोकळी भरून काढू शकतो असा विश्वास स्थानिक नेत्यांत असल्याने त्या एकसंध कामाचा फायदा काँग्रेसला मिळाला.
भिवंडीत यंदा प्रथम चार वॉर्डांचा एक प्रभाग या पद्धतीच्या पॅनलने निवडणूक लढविली गेली. हिंदू आणि मुस्लिम असे दोन्ही मतदार त्यातून एकत्र जोडले गेले. ९० पैकी ६२ जागा लढवताना काँग्रेसने त्याचा पुरेपूर फायदा उटवला आणि दोन्ही समाजातील उमेदवार दिले.
त्यामुळेच मतमोजणीवेळी पहिलाच निकाल काँग्रेसच्या पारड्यात पडला. पक्षाने खाते उघडले आणि नंतर प्रत्येक ठिकाणी आघाडी घेत, ती शेवटपर्यंत कायम ठेवत ४७ जागी विजय मिळवला. पॅनल पद्धतीतही काँग्रेसची सर्वाधिक म्हणजे ११ पॅनल निवडून आली. प्रभाग क्रमांक ११ येथे काँग्रेसचे दोन उमेदवार, तर प्रभाग २० मधून एक उमेदवार निवडून आला.
मनोज म्हात्रे यांची
पत्नी विजयी
भिवंडीतील काँग्रेसचे नेते मनोज म्हात्रे यांची हत्या झाल्याने त्यांची पत्नी वैशाली यांना प्रभाग २० मधून पक्षाने संधी दिली होती. त्यांना विजय मिळाला. या प्रभागातून त्या काँग्रेसच्या एकमेव उमेदवार आहेत. या प्रभागात भाजपाचे तीन उमेदवार निवडून आले आहेत. म्हात्रे आणि भाजपच्या अनिता टावरे यांच्यात शेवटपर्यंत चांगलीच लढत झाली. त्यात म्हात्रे या ९० मतांनी निवडून आल्या. मागील निवडणुकीत मनोज म्हात्रे बिनविरोध निवडून आले होते.
आतापर्यंत तीन महापौर
पहिल्या निवडणुकीत काँग्रेसचे सुरेश टावरे हे महापौर झाले होते. त्यांनी अडीच वर्ष महापौरपद भूषवले. त्यानंतर, जावेद दळवी यांनी दोन वेळा हे पद भूषवले आहे. अर्थात त्यासाठी काँग्रेसला इतर पक्षांची मदत घ्यावी लागली. पण यंदा एकहाती सत्ता आल्याने खऱ्या अर्थाने काँग्रेसला हे पद स्वबळावर मिळेल.
महापौरपद अल्पसंख्याक समाजाला?
भिवंडी : भिवंडी महापालिकेवर काँग्रेसची एकहाती सत्ता आल्याने यंदाचे महापौरपद अल्पसंख्याक समाजाला मिळण्याची शक्यता आहे. महापौरपदाच्या शर्यतीत काँग्रेसचे माजी महापौर जावेद दळवी यांचे नाव जरी चर्चेत असले तरी तरूणांना संधी देण्याचे ठरवल्यास रसिका रांका यांचा विचार होऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे. भिवंडीत काँग्रेसला एकहाती विजय मिळाला. आजवर सतत सत्तेसाठी वेगवेगळ््या पक्षांच्या कुबड्या घ्याव्या लागल्याने शहराचा विकास होऊ न शकल्याचा आरोप होत होता. आता मात्र काँग्रेसला पूर्ण सत्ता मिळाल्याने मतदारांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. काँग्रेसने बहुमत स्पष्ट केल्याने आता त्यामुळे पहिले महापौरपद अल्पसंख्य समाजाला देत त्या समाजात विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी चर्चा आहे. अर्थात या पदासाठी काँग्रेसमध्ये अनेक इच्छुकांत स्पर्धा होण्याचीही शक्यता आहे. मात्र, विश्वसनीय सूत्रांनी काँग्रेसचे माजी महापौर जावेद दळवी आणि काँग्रेस प्रदेश सचिव प्रदीप उर्फ पप्पू रांका यांची मुलगी रसिका यांचे नाव चर्चेत असल्याचे सांगितले. दळवी हे चार वेळा महापालिकेवर निवडून गेले आहेत. त्यांनी दोन वेळा महापौरपद भूषवले आहे. त्यामुळे त्यांना या कामाचा चांगला अनुभव आहे. रसिका यांचे वडील पप्पू रांका हे काँग्रेसचे प्रदेश सचिव आहेत. तसेच भिवंडीतील व्यापारी म्हणूनही त्यांचे प्रस्थ आहे. त्या पहिल्यांदाच निवडून आल्या असल्या, तरी उच्चशिक्षित असल्याचा फायदा त्यांना मिळू शकतो. त्यांना संधी दिली, तर या पदावर महिलेला स्थान दिल्याचा फायदाही पक्षाला मिळेल, असे मानले जाते.