"भारत जोडोचा भाजपने घेतला धसका, केंद्राकडून कोविडचे केवळ निमित्त"
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 09:18 AM2022-12-23T09:18:45+5:302022-12-23T09:19:10+5:30
काँग्रेसचा आरोप.
ठाणे : भाजपने राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा धसका घेतला आहे. परिणामी ही यात्रा रोखण्यासाठी कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचे कारण केंद्र सरकार देत असल्याचा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तारिक अन्वर यांनी गुरूवारी ठाण्यात केला. त्यांना खरंच कोविडची चिंता असेल तर सर्व राजकीय पक्षांचे कार्यक्रम, खासगी कार्यक्रम व अगदी पंतप्रधानांच्या रॅलीवरही बंदी आणावी. तरच उद्देश यशस्वी होईल, असे ते म्हणाले. एका खासगी कार्यक्रमानिमित्ताने ते गुरुवारी ठाण्यात आले होते. त्यानंतर शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
सध्याच्या घडीला काँग्रेस पक्ष संपूर्ण देशात मजबूत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. काही ठिकाणी परिवर्तन केले जात आहे. पण या सर्व घडामोडींना थोडा वेळ लागतो, असे ते म्हणाले. जे कार्यकर्ते पक्षासाठी काम करतात त्यांना येत्या काळात पदाकरिता प्राधान्य देण्यात येईल, असे ते म्हणाले.
भारत जोडो यात्रेच्या यशस्वीतेबाबत सुरुवातीला लोकांना विश्वास नव्हता. पण या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांनी अनेक ठिकाणी राहुल गांधींचे स्वागत केले. या यात्रेचे यश बघून विरोधकांनी तिचा धसका घेतला. यापूर्वी ही यात्रा रोखण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला होता. पण आता लोकांचा उत्साह बघून भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना भीती वाटते. म्हणून कोविडच्या माध्यमातून यात्रा रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी शंका त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केली.
एकत्र बसून सीमावाद सोडवावा
महाराष्ट्र - कर्नाटक सीमावादावर अन्वर म्हणाले की, केंद्रात आणि दोन्ही राज्यांत भाजपची सत्ता आहे. परिणामी केंद्र सरकारने यात हस्तक्षेप करून दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एकत्र बसवून हा प्रश्न सोडवावा. गुजरात निवडणुकीच्या निकालाचे काँग्रेस पक्षाकडून विश्लेषण केले जात आहे. अरविंद केजरीवाल यांच्या माध्यमातून काँग्रेसच्या मतांची विभागणी करण्यात भाजप यशस्वी ठरला. भाजपनेच केजरीवाल यांना गुजरात येथे आणल्याचा आरोपही त्यांनी केला.