मीरा-भार्इंदरमध्ये करवाढीविरोधात काँग्रेस, मनसेचे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2018 08:10 PM2018-02-20T20:10:34+5:302018-02-20T20:11:14+5:30
मीरा-भार्इंदर महापालिकेतील भाजपा सत्ताधा-यांनी बहुमताच्या जोरावर करवाढ करून सामान्य नागरिकांना वेठीस धरल्याचा आरोप करीत काँग्रेस व मनसेने पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर मंगळवारी करवाढीविरोधात तीव्र आंदोलन छेडले.
भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेतील भाजपा सत्ताधा-यांनी बहुमताच्या जोरावर करवाढ करून सामान्य नागरिकांना वेठीस धरल्याचा आरोप करीत काँग्रेस व मनसेने पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर मंगळवारी करवाढीविरोधात तीव्र आंदोलन छेडले. भाजपाला एकहाती सत्ता मिळविल्याचा माज आला असून, त्यांनी मनमानी कारभार सुरू केला आहे. त्यांनी बहुमताच्या जोरावर मालमत्ता करासह पाणीपट्टीत दरवाढ करून नवीन घनकचरा शुल्क सामान्य नागरिकांच्या माथी मारले.
तसेच भाडेतत्त्वावरील मालमत्ता करांत कपात करून व्यावसायिकांना झुकते माप दिले. भाजपाच्या या दुजाभावामुळे नागरिकांवर दरवर्षी वाढीव कराच्या माध्यमातून सुमारे १ ते दीड हजार रुपयांचा आर्थिक बोजा पडणार आहे. भाजपाने आपल्या कार्यकाळात नागरिकांना अच्छे दिन नव्हे तर बुरे दिन दाखविण्यास सुरुवात केली आहे. सरकारी अनुदानात मिळालेले शेकडो कोटींचे सरकारी अनुदान विकासकामांसाठी मिळालेले असताना ते गेले कुठे, असा आरोप करीत काँग्रेस व मनसेने काळ्या फिती लावून करवाढीविरोधात पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर तीव्र आंदोलन छेडले. यावेळी सत्ताधारी भाजपाविरोधात आंदोलकांनी घोषणाबाजी केली.
आंदोलनात काँग्रेसच्या माजी उपमहापौर नूरजहाँ हुसेन, जिल्हाध्यक्ष अनिल सावंत, महिला जिल्हाध्यक्ष लीला पाटील, गटनेता जुबेर इनामदार, नगरसेवक राजीव मेहरा, अश्रफ शेख, माजी नगरसेविका सुनीता पाटील, युवा जिल्हा उपाध्यक्ष राकेश राजपुरोहित, पदाधिकारी फारुक शेख, अंकुश मालुसरे, उमर कपूर, राजकुमार मिश्रा तसेच मनसे शहराध्यक्ष प्रसाद सुर्वे, सचिव नरेंद्र पाटोळे, उपशहराध्यक्ष शशी मेंडन, हेमंत सावंत, दिनेश कनावजे, महिला शहराध्यक्ष पुतूल अधिकारी, मनविसे रॉबर्ट डिसोझा, सचिन पोपळे आदी पदाधिकारी व कार्यर्त्यांनी सहभाग घेतला.