पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 03:06 AM2018-04-09T03:06:45+5:302018-04-09T03:06:45+5:30
देशात पेट्रोल व डिझेलचे दर गगनाला भिडले असल्याने सामान्य नागरिकांना लागणाऱ्या मूलभूत गरजांचेही दर वाढत आहेत.
वाडा : देशात पेट्रोल व डिझेलचे दर गगनाला भिडले असल्याने सामान्य नागरिकांना लागणाऱ्या मूलभूत गरजांचेही दर वाढत आहेत त्यामुळे सामान्य माणूस भरडला जात आहे. या दरवाढीचा निषेध करण्यासाठी वाडा तालुका काँग्रेसच्यावतीने रविवारी सकाळी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले आहे. यात ‘मोदी सरकार हाय हाय, राजा फिरतो विदेशभर, गरीब जनता फासावर, नरेंद्र देवेन्द्र सरकारचा निषेध असो, अशा घोषणा देण्यात आल्या.
मोदी सरकारने देशात वस्तू व सेवा कर प्रणाली अंमलात आणली आहे. याच प्रणालीच्या कक्षेत पेट्रोल व डिझेलचे दर आणले तर पेट्रोल व डिझेलचे दर कमी होतील त्यासाठी पेट्रोल व डिझेलचे दर जी.एस.टी.च्या अंतर्गत आणण्याची मागणी कोकण विभाग काँग्रेसचे अध्यक्ष मुस्तफा मेमन यांनी केली आहे. यावेळी राज्य शासनाच्या सदोष धोरणावर टिका करण्यात आली.
या प्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ट नेते इरफान सुसे, पालघर जिल्हा
उपाध्यक्ष काशिनाथ वेखंडे, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष रामदास जाधव, शहर अध्यक्ष सुशील
पातकर, महिला कॉग्रेसच्या तालुकाध्यक्षा दर्शना भोईर, नगरसेविका विशाखा पाटील, भारती सपाटे, चालक मालक संघटनेचे अविनाश डेंगाणे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.