कॉंग्रेस खासदार धीरज साहूंच्या पुतळ्याचे ठाणे भाजप महिला मोर्चाकडून दहन
By अजित मांडके | Published: December 11, 2023 05:03 PM2023-12-11T17:03:39+5:302023-12-11T17:05:00+5:30
महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्नेहा पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात कॉंग्रेसच्या निषेधाच्या घोषणा देऊन साहू यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.
ठाणे : काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार धीरज साहू यांच्याकडे तब्बल ३१८ कोटींहून अधिक रोख रक्कम सापडल्याच्या निषेधार्थ भाजप महिला मोर्चाच्या वतीने ठाण्यात जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले. भाजपचे ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या प्रमुख उपस्थितीत व महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्नेहा पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात कॉंग्रेसच्या निषेधाच्या घोषणा देऊन साहू यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.
धीरज साहू यांच्या घर व कार्यालयांवर टाकलेल्या छाप्यांत आतापर्यंत ३१८ कोटींहून अधिक रोकड जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या नोटा मोजताना मशिनही बिघडली. या प्रकरणात साहूंविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी महिला मोर्चाच्या वतीने करण्यात आली. गरिबीचा नारा देणाऱ्या काँग्रेसने थोडी तरी लाज बाळगावी, अशी प्रतिक्रिया महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्नेहा पाटील यांनी व्यक्त केली. तर या प्रकरणामुळे कॉंग्रेस म्हणजे भ्रष्टाचार हे सिद्ध झाले आहे. भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांमध्ये कॉंग्रेसचे हात बरबटलेले आहेत, अशा शब्दांत जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी कॉंग्रेसवर टीका केली.