काँग्रेस-राष्ट्रवादी-भारिपची एकत्रित आघाडी
By admin | Published: February 2, 2017 03:10 AM2017-02-02T03:10:22+5:302017-02-02T03:10:22+5:30
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांचा भारिप यांची आघाडी मनपा निवडणुकीत होण्याचे स्पष्ट संकेत असून जागावाटप अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात
- पंकज पाटील, उल्हासनगर
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांचा भारिप यांची आघाडी मनपा निवडणुकीत होण्याचे स्पष्ट संकेत असून जागावाटप अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. १५ पॅनलमधील जागावाटपाचा घोळ सुटला असून केवळ ५ पॅनलमधील जागावाटपाचा तिढा सुटणे बाकी असल्याचे सांगण्यात आले.
उल्हासनगरमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीबाबत बैठकांचे सत्र सुरू आहे. आघाडीबाबतची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी ठाण्यात झाली. या बैठकीत सकारात्मक निर्णय झाले. जागावाटपाचा तिढा सोडवण्याकरिता पुन्हा उद्या (गुरुवारी) बैठक होणार आहे.
सुरुवातीपासून आघाडीसाठी आग्रही असलेल्या काँग्रेसने ओमी यांच्या पक्ष सोडण्यामुळे उतरती कळा लागलेल्या राष्ट्रवादीला साथ देण्याची तयारी दर्शवली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या भारिपला सोबत घेतल्याने काही जागा भारिपला सोडणे बंधनकारक ठरणार आहे. यासोबत स्वाभिमानी संघटना आणि भाई जगताप यांच्या कामगार संघटनेला सोबत घेऊन ही निवडणूक लढवणार असल्याने त्यांनाही काही जागा देणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्प्यातच पक्षाचे ‘ए-बी’ फॉर्म दाखल होणार आहेत. राष्ट्रवादीतर्फे गणेश नाईक आणि प्रमोद हिंदुराव हे पुढाकार घेत असून काँग्रेसतर्फे निरीक्षक सुभाष कानडे, प्रभारी निलेश पेढारी पुढाकार घेत आहेत.
भाजपा आणि टीम ओमी यांच्या जागावाटपानंतर जे उमेदवार उमेदवारीपासून वंचित राहतील, त्यांना गळाला लावण्याचे काम काँग्रेस करणार आहे. काँग्रेसमध्ये बंडखोरी होणार नाही, याचीदेखील काळजी घेतली जात आहे. ज्या प्रभागात राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे जागावाटपातील वाद आहेत, त्या जागेवर तोडगा काढण्यासाठी वरिष्ठांच्या निर्णयाची प्रतीक्षा केली जात आहे.
आघाडीकरिता काँग्रेस सुरुवातीपासून प्रयत्नशील होती. समविचारी पक्षांना आणि संघटनांना सोबत घेऊन काँग्रेस निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार आहे. उल्हासनगरची त्रस्त जनता काँग्रेससोबत राहील. - निलेश पेढारी, प्रभारी, काँग्रेस
आघाडीबाबतची चर्चा सुरू आहे. येत्या एकदोन दिवसांत त्यावर निर्णय घेऊन निवडणूक सोबत लढवण्यात येईल. जागावाटपाबाबत चर्चा सुरू असून वरिष्ठांच्या निर्देशाप्रमाणेच निर्णय घेतले जातील. -प्रमोद हिंदुराव, राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस