काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात महाराष्ट्राची अधोगती; भाजपा प्रदेशाध्यक्ष दानवेंचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2018 07:15 PM2018-01-23T19:15:23+5:302018-01-23T19:15:48+5:30
काँग्रेस, राष्ट्रवादीच्या १५ वर्षांच्या कार्यकाळात महाराष्ट्राची प्रगती नव्हे तर अधोगती झाल्याचा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी करून आता भाजपाने राज्याला एक क्रमांकाचे राज्य बनविल्याचा दावा त्यांनी माजी महापौर गीता जैन यांच्या भार्इंदर पश्चिमेकडील जैन देरासर येथील जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनपर कार्यक्रमात केला.
भार्इंदर - काँग्रेस, राष्ट्रवादीच्या १५ वर्षांच्या कार्यकाळात महाराष्ट्राची प्रगती नव्हे तर अधोगती झाल्याचा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी करून आता भाजपाने राज्याला एक क्रमांकाचे राज्य बनविल्याचा दावा त्यांनी माजी महापौर गीता जैन यांच्या भार्इंदर पश्चिमेकडील जैन देरासर येथील जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनपर कार्यक्रमात केला.
पुढे बोलताना त्यांनी भाजपा देशासह राज्यात मोठ्या प्रमाणात वाढत असून, देशाचे चित्र बदलत असल्याचे सांगितले. यापूर्वी भाजपा चौथ्या क्रमांकाचा पक्ष होता, तो आता जनतेने साथ दिल्यामुळे एक क्रमांकाचा पक्ष राहिल्याचा दावा त्यांनी केला. देशातील १८ राज्ये तसेच सर्वात जास्त महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदा भाजपाच्या ताब्यात असल्याची माहिती देत त्यात वाढ होत असल्याचा दावाही त्यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात परदेशी गुंतवणूक वाढवून बेकारी हटविण्याचं काम करीत असल्याचे सांगून देशातील राज्यांपैकी सर्वात जास्त परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात झाल्याचा दावा त्यांनी केला.
पालिकेचा कारभार लोकाभिमुख व्हावा, यासाठी भाजपा सतत प्रयत्नशील असून, पालिकेत जनतेने भाजपाला २०१७ मधील निवडणुकीत दिलेल्या घवघवीत यशाबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले. शहरातील तळागळातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्ष वाढवावा, यासाठी सुरू केलेल्या जनसंपर्क कार्यालयासाठी जैन यांना धन्यवाद देत त्यांनी अशा जनसंपर्कासाठी इतरांनी देखील प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यावेळी खासदार कपिल पाटील, राज्यमंत्री राम शिंदे, आ. प्रशांत बम, आ. चैनसुख संचैती, आ. नरेंद्र मेहता, महापौर डिंपल मेहता, उपमहापौर चंद्रकांत वैती, स्थायी समिती सभापती ध्रुवकिशोर पाटील, सभागृह नेता रोहिदास पाटील, भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष गौरव पोरवाल आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवेंद्र पोरवाल यांनी केले. २०१७ मधील पालिका निवडणुकीवेळी भाजपातून शिवसेनेत गेलेल्या माजी नगरसेविका सुमन कोठारी, प्रतिभा तांगडे-पाटील यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावल्याने ते पुन्हा स्वगृही परतल्याचे दिसून आले.