रस्ते सफाईच्या २३ निविदांच्या मुदतवाढीस काँग्रेसचा आक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:50 AM2021-04-30T04:50:33+5:302021-04-30T04:50:33+5:30
ठाणे : महापालिका हद्दीतील अत्यावश्यक असलेल्या २३ गटांच्या दैनंदिन रस्ते सफाईच्या ऑनलाईन निविदांना वारंवार मुदतवाढ दिली जात आहे. ...
ठाणे : महापालिका हद्दीतील अत्यावश्यक असलेल्या २३ गटांच्या दैनंदिन रस्ते सफाईच्या ऑनलाईन निविदांना वारंवार मुदतवाढ दिली जात आहे. परंतु, दुसरीकडे इतर निविदांना मात्र ती दिली जात नाही. त्यामुळे आपल्या मर्जीतील ठेकेदारालाच या निविदा मिळाव्यात म्हणून ही मुदतवाढ दिली जात आहे का? असा सवाल काँग्रेसचे सदस्य संजय घाडीगावकर यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी महापलिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना पत्रव्यवहार करून यामागचे कारण काय, त्याचे उत्तर मागितले आहे.
महापालिका हद्दीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असल्याचे कारण देत या निविदेला दोनवेळा मुदतावढ देऊन पुन्हा १८ मे २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. परंतु, दुसरीकडे घनकचरा व्यवस्थापन विभागाने त्यानंतर काढलेल्या नालेसफाईच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. अशाचप्रकारे पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पायवाट, गटारांच्या निविदा, आरोग्य विभागाच्या कोविड १९ उपाययोजनाबाबत निविदा, उद्यानांची निगा देखभाल यांच्या निविदा प्रकिया कशा पूर्ण केल्या जात आहेत? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. कोविड १९ लाटेत दैनंदिन रस्तेसफाई अत्यंत महत्त्वपूर्ण असताना, उपरोक्त निविदांना वारंवार मुदतवाढ दिली जात आहे. यामागील मुख्य कारण महापालिका अधिकारी आणि रस्तेसफाईमधील काही विशेष ठेकेदार यांची अभद्र युती झालेली आहे का? असा आरोपही त्यांनी केला आहे.