पुलवामा घटनेच्या निषेधार्थ ठाण्यात काँग्रेसचे आंदोलन, सरकार विरोधात घोषणाबाजी
By सुरेश लोखंडे | Published: April 17, 2023 04:36 PM2023-04-17T16:36:11+5:302023-04-17T16:36:21+5:30
फलक घेऊन केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली.
ठाणे: जम्मू-कश्मिर चे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केलेल्या पुलवामा घटनेच्या खुलास्यामुळे काॅग्रेस पक्षाने "शर्म करो..." असा नारा देत निदर्शने ठाण्यातही ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून कार्यकर्त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. फलक घेऊन केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली.
ठाणे काँग्रेस अध्यक्ष अॅड.विक्रांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी ,संरक्षण मंत्री राजनाथ सिंग ,भाजपा सरकार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याप्रसंगी बोलतांना ठाणे काॅग्रेस अध्यक्ष अॅड.विक्रांत चव्हाण यांनी सागितले की,जम्मू-काश्मिर चे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक हे पंतप्रधानाच्या अत्यंत विश्वासू असतानाही त्यांनी अत्यंत निडरपणे पुलवामा घटनेचा खुलासा केला आतापर्यंत आपण एका वेगळ्याच पद्धतीने पुलवामा घटनेला बघत होतो परंतु मलिक यांच्या या विधानामुळे केंद्रातील भा.ज.पा.सरकारचे या घटनेत अक्षम्य चूक झाली असून या वक्तव्यावर मलिक यांना गप्प राहण्यास का सागितले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी या प्रश्नाचा खुलासा करून जनतेला उत्तर दिले पाहिजेत अशी मागणीही चव्हाण यांनी यावेळी केले. पुलवामा घटनेतील वापरलेले ३०० किलो आरडीएक्स कुठुन आले होते? असा सवाल करून या घटनेतील ४० जवानांचे बलिदान हे भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी षडयत्र रचून लोकसभा निवडणुक जिंकण्यासाठीच केले होते, असा आरोप काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे यांनी करून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
श्रीसदस्यांना श्रध्दाजली
ठाण्यातील शहर काॅग्रेसच्या वतीने" शर्म करो मोदीजी" हे आंदोलन सूरू करण्यापूर्वी रविवारी खारघर येथील दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या श्रीसदस्यांना सर्वप्रथम श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर काॅग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन सूरू केले.