अदानी समूहाच्या गैरकारभाराविरोधात एलआयसी व स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर काँग्रेसचे आंदोलन
By सदानंद नाईक | Published: February 6, 2023 06:07 PM2023-02-06T18:07:06+5:302023-02-06T18:07:15+5:30
शहर काँग्रेसने शहाराध्यक्ष रोहित साळवे यांच्या नेतृत्वाखाली अदानी उद्योग समूहाच्या गैरकारभाराविरोधात एलआयसी व स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर नागरिकांच्या ठेवी सुरक्षित राहाव्या यासाठी आंदोलन केले.
उल्हासनगर : शहर काँग्रेसने शहाराध्यक्ष रोहित साळवे यांच्या नेतृत्वाखाली अदानी उद्योग समूहाच्या गैरकारभाराविरोधात एलआयसी व स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर नागरिकांच्या ठेवी सुरक्षित राहाव्या यासाठी आंदोलन केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अदानी ग्रुप यांच्या विरोधात घोषणाबाजी करून अदानी ग्रुपच्या चौकशीची मागणी केली.
उल्हासनगर विठ्ठलवाडी पोलीस वसाहती समोरील एलआयसी कार्यालया समोर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अदानी समूहाच्या गैरकारभार विरोधात आंदोलन करण्यात आले. एलआयसी व स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या देशाचे गौरव असून त्यावर सर्व सामान्य नागरिकांचा विश्वास आहे. या वित्तीय संस्थांमध्ये भविष्य काळासाठी सर्वसामान्य नागरिक, मध्यमवर्ग, नोकरदार, छोटे व्यापारी यांनी आपल्या मेहनतीचा पैसा गुंतवला आहे. देशातील मोदी सरकारने अदानींच्या कंपन्यांमध्ये हा पैसा जबरदस्तीने गुंतविल्याचा आरोप शहराध्यक्ष रोहित साळवे यांनी यावेळी केला. अदानी समुहातील गैरकारभारामुळे एलआयसीच्या ३९ कोटी पॉलिसधारक व गुंतवणूकदारांचे ३३ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे साळवे म्हणाले. तसेच भारतीय स्टेट बँक व इतर बँकांनी मिळून तब्बल ८० हजार कोटी रुपयांचे कर्ज अदानी उधोग समूहाला दिले आहे. काँग्रेस पक्ष कोणत्याही उद्योगपतीच्या विरोधात नाही. परंतु खास उद्योगपतीसाठी नियम बदलून जनतेचा पैसा धोक्यात घालण्यास काँग्रेसचा विरोध आहे.
काँग्रेस पक्ष नेहमीच देशातील सामान्य जनतेच्या पाठीशी उभा राहिला आहे. या गैर कारभाराची संयुक्त संसदीय समिती मार्फत सर्वोच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांच्या देखरेखीखाली चौकशी करण्यात यावी अशी मागणी रोहित साळवे यांनी केली. तर मोती लुढवाणी यांनी एलआयसी व स्टेट बँक ऑफ इंडिया मधील नागरिकांच्या ठेवी सुरक्षित राहण्यासंबंधी सरकारने संसदेत चर्चा करून जनतेला आश्वस्त करावे अशी मागणी केली. आंदोलनांत पक्षाचे किशोर धडके, नानिक आहुजा, मोती लुढवाणी, अहमद खान, अझीझ खान, शहबुद्धीन खान, महादेव शेलार, विशाल सोनवणे, मुन्ना श्रीवास्तव, फामिदा सय्यद, भारती फुलवरीया, विद्या चव्हाण, पवन मीरानी, दीपक गायकवाड, अन्सार शेख, योगेश शिंदे, मनोहर मनुजा, राजमोहन नायर, सुलक्षण भालेराव, आबा साठे, हिरामण तायडे, संतोष वानखेडे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.