उल्हासनगरात भाजपाच्या मागणीला काँग्रेसचा पाठिंबा; आयुक्तांना दिले निवेदन
By सदानंद नाईक | Published: January 29, 2024 06:59 PM2024-01-29T18:59:55+5:302024-01-29T19:00:13+5:30
टेंडरवारात काँग्रेसची उडी, आयुक्तांना निवेदन;
उल्हासनगर : भाजपने पत्रकार परिषद घेऊन १०० कोटीचा टेंडर घोटाळा आरोप करून झापी अँड कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी महापालिका आयुक्तांना केली होती. काँग्रेसने यामध्ये उडी घेत भाजपच्या मागणीला पाठिंबा असल्याचे निवेदन आयुक्त अजीज शेख यांना देऊन पारदर्शकपणे चौकशी करून कारवाईची मागणी केली.
उल्हासनगर महापालिका टेंडर घोटाळ्या बाबत गेल्या आठवड्यात भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी, आमदार कुमार आयलानी यांनी पत्रकार परिषद घेऊन १०० कोटीच्या घोटाळ्याचे आरोप केले. याबाबत शिवसेना शिंदे गटाचे कल्याण उपजिल्हाप्रमुख अरुण अशांन यांच्यावर गंभीर आरोप करून झापी अँड कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली. त्यानंतर अरुण अशान व झापी अँड कंपनीच्या प्रमुखांनीही पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या शहरजिल्हाध्यक्षवर आरोप केले. दरम्यान यांच्यात समझोता झाल्याची चर्चाही रंगली होती. मात्र काँग्रेस पक्षाचे शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी सोमवारी दुपारी आयुक्त अजीज शेख यांची भेट घेऊन, भाजपच्या मागणीला पाठिंबा असल्याचे निवेदन दिले. ज्या ठेकेदारावर घोटाळ्याचे आरोप झाले. त्याला महापालिकेने कोट्यवधींच्या निधींतील विकास कामाचे ठेके दिले असून निकृष्ट कामाबाबत यापूर्वी आरोप झाल्याचे साळवे यांचे म्हणणे आहे.
भाजपने केलेल्या सर्व आरोपांवर कारवाई व खुलासा करून जनते समोर आणून महापालिकेची विश्वासहर्ता कायम ठेवावी. अशी मागणी साळवे यांनी महापालिका आयुक्तांना केली. येत्या पंधरा दिवसात या संदर्भात काहीही कारवाई न झाल्यास काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन घेण्यात येईल. असा इशाराही साळवे यांनी दिला आहे. प्रदीप रामचंदानी हे बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय असून अरुण अशान हे मुख्यमंत्री व खासदार यांचे निकटवर्तीय आहेत. दोघांच्याही आरोपाची चौकशी महापालिका आयुक्तांनी केल्यास, मोठा घोटाळा उघड होण्याची शक्यता साळवे यांनी व्यक्त केली. काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळात नाणिक अहुजा, किशोर धडके, कामगार नेता आशाराम टाक आदीजन उपस्थित होते.
टेंडरवार प्रकरणी आयुक्तांची शहर अभियंताला तंबी?
शहरात शिवसेना शिंदे गट व भाजपात टेंडरवारवरून आरोप-प्रत्यारोप रंगले आहे. याबाबत अधिक वाद निर्माण होऊ नये म्हणून आयुक्त अजीज शेख यांनी शहर अभियंता संदीप जाधव यांना पत्रकारांना प्रतिक्रिया देण्याची तंबी दिली. याबाबत अधिकृतपणे आयुक्त प्रतिक्रिया देणार असल्याची माहिती शहर अभियंता जाधव यांनी दिली आहे.