काँग्रेस ठाणे शहराध्यक्षपद राहणार नामधारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:25 AM2021-06-27T04:25:59+5:302021-06-27T04:25:59+5:30
ठाणे : राज्यातील आगामी निवडणुकीसाठी ‘एकला चलो रे’चा नारा काँग्रेस पक्षाने दिला आहे. त्यातच पक्षाला पुन्हा ठाणे शहरात जुने ...
ठाणे : राज्यातील आगामी निवडणुकीसाठी ‘एकला चलो रे’चा नारा काँग्रेस पक्षाने दिला आहे. त्यातच पक्षाला पुन्हा ठाणे शहरात जुने दिवस दिसावे, यासाठी काँग्रेसच्या प्रदेशाच्या वरिष्ठ पातळीने चांगलीच कंबर कसली आहे. ठाणे शहराध्यक्षाच्या जोडीला आठ शिलेदारांची फौज तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
यात प्रत्येकी दोघांना एका-एका विधानसभा क्षेत्राची जबाबदारी दिली जाणार आहे. त्यांच्यावर टाकलेल्या जबाबदारीला त्यांनी योग्य न्याय देऊन काँग्रेसला सुगीचे दिवस तसेच जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी निवडून महापालिकेवर पाठवले तर अशा शिलेदाराला थेट महापालिकेत मागच्या दारातून सभागृहात पाठवण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसच्या खास सूत्रांनी दिली. या आठही शिलेदारांची नावे अद्यापही गुलदस्त्यात आहेत. या अनोख्या प्रयोगातून ठाणे शहराध्यक्षाचे पंख छाटले जाणार हे जवळपास निश्चित असल्याचे बोलले जात आहे.
एकेकाळी काँग्रेसचा ठाणे शहरासह जिल्ह्यात चांगला बोलबाला होता. मात्र, गेल्या काही वर्षांपासून उफाळलेल्या गटबाजीने नव्या नेत्यांची फळी उभी राहिली नाही. त्यामुळे काँग्रेस पक्ष अक्षरशः रसातळाला गेला. आमदार, खासदारांबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेत मोठे संख्याबळ ठेवणाऱ्या काँग्रेसला आता हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच स्थानिक स्वराज्य संस्थेत लोकप्रतिनिधी आहेत. एक खासदार राज्यसभेवर आहेत ते सोडले तर आमदार आणि खासदार सद्य:स्थितीत जिल्ह्यात काँग्रेसचा एकही नाही. यामुळे आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एकला चलो रे असा नारा देऊन प्रत्येक ठिकाणी चाचपणीही सुरू केली आहे. काँग्रेसचे राज्यातील आजी-माजी मंत्री ठाण्यात येत आहेत. त्यातच शहराध्यक्षपदासाठी अजूनही रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे एकावर ठाण्यातील चार विधानसभांची जबाबदारी टाकण्यापेक्षा त्या-त्या विधानसभेसाठी अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष नेमणे सोयीचे होईल, असा विचार केला जात आहे. त्यातून त्या चारही ठिकाणी वर्चस्व असलेल्या मंडळींचा कसून तपास सुरू आहे. अशा आठ जणांचा फौजेसह शहराध्यक्षावर प्रदेश कमिटीचे नियंत्रण राहणार आहे. एकंदरीत या सर्व प्रक्रियेवर येत्या काही दिवसांत शिक्कामोर्तब होणार आहे.