मोदी सरकारच्या अन्यायाविरोधात काँग्रेस कायम उभी करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:41 AM2021-03-27T04:41:43+5:302021-03-27T04:41:43+5:30
ठाणे : देशातील सर्व शेतकरीवर्ग, कामगारवर्ग, बेरोजगार युवक, महागाईने त्रस्त झालेल्या महिला आदींच्या पाठीशी काँग्रेस ठामपणे उभी राहणार ...
ठाणे : देशातील सर्व शेतकरीवर्ग, कामगारवर्ग, बेरोजगार युवक, महागाईने त्रस्त झालेल्या महिला आदींच्या पाठीशी काँग्रेस ठामपणे उभी राहणार असून त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात कायम विरोध करणार असल्याचे मत काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष व माजी मंत्री नसीम खान यांनी शुक्रवारी ठाण्यात व्यक्त केले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या संपूर्ण राज्यभर तीन नवे कृषी कायदे तसेच महागाईच्या मुद्द्यावर केंद्रातील मोदी सरकारला जागे करण्यासाठी विविध शेतकरी संघटनांनी २६ मार्च रोजी भारत बंदची हाक दिली होती. या बंदला पाठिंबा देण्याकरिता प्रत्येक जिल्ह्यातील मुख्यालयासमोर उपोषण करण्यात आले. जिल्हा काँग्रेसच्या वतीने ठाण्यातही स्टेशनबाहेर धरणे धरून दिवसभर काँग्रेस कार्यकर्त्यांनी उपोषण केले. या उपोषणास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष व माजी मंत्री नसीम खान, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस व ठाणे प्रभारी राजेश शर्मा, तारिक फारुकी, जिल्हाध्यक्ष ॲड. विक्रांत चव्हाण आदी उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना खान यांनी सांगितले, खोट्या आश्वासनांच्या जिवावर सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारला आता या आश्वासनांचा विसर पडला आहे, देशातील शेतकरी आंदोलनात ३०० नाहक बळी गेलेत, अजूनही हे आंदोलन सुरूच आहे. महागाई गगनाला भिडली असून, बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले असतानाही या सरकारला अजून जाग येत नाही. या सरकारला जागे करण्याची वेळ आता आली असून ठिकठिकाणी या सरकारविरोधात काँग्रेस पक्षाबरोबर विविध कामगार संघटना, सामाजिक संस्थादेखील सहभागी होत असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले.